नांदेड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
By Admin | Updated: June 8, 2017 00:30 IST2017-06-08T00:27:24+5:302017-06-08T00:30:27+5:30
नांदेड: रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या दिवशी नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने मध्यंतरी उघडीप दिली होती़

नांदेड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या दिवशी नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने मध्यंतरी उघडीप दिली होती़ ८ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होणार असून त्यापूर्वीच दोन दिवस नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे़ मंगळवारी रात्रभर पावसाची संततधार सुरु होती़ त्यानंतर बुधवारी सायंकाळी नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली होती़
२८ मे रोजी रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली होती़ त्याच दिवशी नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती़ उकाडा आणि वाढत्या तापमानाच्या पाऱ्यामुळे घामाघूम झालेल्या नांदेडकरांना त्यामुळे दिलासा मिळाला होता़ परंतु त्यानंतर पावसाने उघडीप दिली़ अधूनमधून काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा ८ जूनपासून लागणाऱ्या मृग नक्षत्राकडे होत्या़ त्यात ६ जून रोजी सायंकाळी नांदेड शहरासह जिल्हाभरात रात्री दहा वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली़ वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटांसह जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस होता़ पावसामुळे नांदेड शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते़ तर अर्ध्याअधिक शहराचा वीजपुरवठाही खंडित झाला होता़
त्यानंतर बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते़ सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरात पावसाने हजेरी लावली होती़ त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता़ त्यानंतर रात्री पुन्हा एकदा काही भागात पावसाने जोर धरला होता़ मंगळवारी रात्री नांदेड शहरात ३५़३५ मि़ मी़ पावसाची नोंद झाली़ तर मुदखेड-४५़४२, अर्धापूर-३६़१०, भोकर-४१़२८, उमरी-४१़२८, कंधार-३३़५३, लोहा-३६़८९, किनवट-४१़५६, माहूर-४१़५६, हदगाव-३८़७६, हिमायतनगर-३८़७६, देगलूर-३७़३३, बिलोली-३७़९४, धर्माबाद-३६़४०, नायगाव-३६़७० व मुखेडमध्ये ३६़१० मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़ अशाप्रकारे जिल्ह्यात सरासरी ३८़४६ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़