वाळू माफियांविरोधात दमदार मोहीम
By Admin | Updated: May 25, 2014 01:03 IST2014-05-25T00:58:12+5:302014-05-25T01:03:30+5:30
अंबड : महसूल विभागाच्या पथकाने वाळू माफियांविरोधात दोन दिवस मोहीम राबवून पाच ट्रक व वाळूचे साठे जप्त केले.

वाळू माफियांविरोधात दमदार मोहीम
अंबड : महसूल विभागाच्या पथकाने वाळू माफियांविरोधात दोन दिवस मोहीम राबवून पाच ट्रक व वाळूचे साठे जप्त केले. सामान्य नागरिकांना वाळू तस्करांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याविषयीचे वृत्त लोकमतने बुधवारी प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत स्वत: उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीमंत हारकर व तहसीलदार महेश सावंत यांनी शुक्रवारी दिवसभर गोदापात्रात पाहणी करुन वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम राबविली. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, तहसीलदार महेश सावंत, मंडळ अधिकारी के.एस.ऐडके, ए.बी.मिरासे, तलाठी पठाण यांच्या पथकाने गोदापात्राची पाहणी करण्यास सुरुवात केली. शुक्रवार व शनिवारी या पथकाने वाळकेश्वर, गोरी-गंधारी, कुरण, गोंदी भागातील गोदापात्रात मोहीम राबविली. यावेळी पथकास गोंदीजवळील भाग्यनगर येथे अवैध वाळूसाठा असल्याची माहिती मिळाली. पथकाने हा साठा जप्त केला. याविषयी गोंदी पोलीसांत तक्रार देणार असल्याचे सांगण्यात आले. ही मोहीम शनिवारीही सुरु होती. या मोहिमेत अवैध वाळू वाहतूक करणार्या, क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक करणार्या एम.एच.२०-सी. टी. ३३३, एम. एच. ३१-सी. क्यू. ७७२९, एम. एच. २०- ए. टी. १०७७, एम. एच. २०-ए. टी. ९७७७, एम. एच. ०४- एच ६५७२ असे पाच हायवा ट्रक जप्त केले. या सर्व वाहनांवर कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक सुरू असल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांवरुन वाहतूक करणे अशक्य झाले आहे. वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. एका वाहनामध्ये केवळ २ ब्रास वाळू नेण्याची परवानगी असताना ट्रकमधून ५ ते ६ ब्रास वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. (वार्ताहर)सरकारी वाहनाने पाहणी करत असल्याची बाब सर्वसामान्यांसह वाळू माफियांच्या लक्षात येईल, हे ओळखून पथकाने सरकारी वाहनाऐवजी खाजगी वाहनांचा वापर केला. खाजगी वाहन असुनही महसूल पथक गोदापात्रात उतरल्याची कुणकुण वाळू माफियांंना लागलीच. पथक गोदापात्रात आल्याचे कळताच वाळू माफियांनी आपापल्या ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनांसह दिसेल त्या दिशेने पळ काढला.