जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन

By Admin | Updated: June 10, 2014 00:34 IST2014-06-10T00:32:46+5:302014-06-10T00:34:27+5:30

बीड :उन्हाच्या काहिलीने वैतागलेल्या जिल्हावासीयांना सोमवारी सायंकाळी पहिल्याच पावसाने दिलासा मिळाला़ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली़

Strong arrival of rain in the district | जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन

जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन

बीड :उन्हाच्या काहिलीने वैतागलेल्या जिल्हावासीयांना सोमवारी सायंकाळी पहिल्याच पावसाने दिलासा मिळाला़ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ या पावसाने शेतकरी सुखावला असून मान्सून सक्रिय झाला आहे़
पारा ४४ अंशांवर गेल्याने उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले़ पाण्याचा प्रश्नही बिकट स्वरुप धारण करत होता़ त्यामुळे जून उजाडल्यावर सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती़ नवव्या दिवशी ही प्रतीक्षा संपली़ बीड शहरासह परिसरात सायंकाळी सहा वाजता मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली़ या पावसादरम्यान जोरदार वारे होते़ आकाशात विजाही कडकडत होत्या़ पहिल्याच पावसाने शहरातील रस्ते, नाल्या तुडुंब भरुन वाहिल्या़ सुभाष रोड, भाजीमंडई, नगररोड, बशीरगंज, राजीव गांधी चौक येथे पाणीच पाणी झाले़ पाण्यातून वाट शोधताना वाहनचालकांसोबतच पादचाऱ्यांना कसरत करावी लागली़ पावसाने चाकरमान्यांचेही मोठे हाल झाले़ सायंकाळची वेळ असल्याने अनेकांची पावले घराकडे वळली होती़ मात्र, पावसाने रस्त्यातच गाठल्याने त्यांना चिंब भिजावे लागले़ जवळपास अर्धातास पाऊस सुरू होता. रात्री उशिरापर्यंत आकाशात ढग दाटून आले होते. अंबाजोगाई, माजलगाव, परळी, केज, धारूर वगळता सर्वत्र पाऊस झाला. मृगात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आणखी मोठा पाऊस झाल्यानंतर बळीराजा तिफणीवर मूठ ठेवणार आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने मोठा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी पाऊस पडण्यापूर्वीच बी- बियाणे, खतांची जुळवाजुळव सुरू केली होती. मंगळवारपासून कृषी दुकानांवर शेतकऱ्यांची गर्दी जाणवणार असल्याची शक्यता आहे.
बच्चेकंपनीने लुटला आनंद
सोमवारी पहिल्याच दिवशी झालेल्या पावसात भिजण्याचा बच्चेकंपनीने मनसोक्त आनंद लुटला. शहरातील विविध भागांत आपल्या अंगणात पावसामध्ये नाचताना लहान मुले दिसून आली. पावसाळा सुरू झाल्यामुळे बच्चेकंपनीमध्ये वेगळाच उत्साह पहावयास मिळाला.
पाटोद्यात जोरदार पाऊस
पाटोदा शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी ७ वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. त्यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. मोठमोठी झाडेही उन्मळून पडल्याचे वृत्त आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
पाचेगावमध्ये बैलजोडी ठार
गेवराई तालुक्यातील पाचेगाव परिसरात सोमवारी दुपारी ३ वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणात वादळी वारे सुटले. वाऱ्यामुळे एका विद्युत खांबावरील तार तुटून पडली. या तारेला बैलजोडी चिकटल्याने ती ठार झाली. बापूसाहेब पांडुरंग हातवटे यांच्या शेतामध्ये काम सुरू होते. या दरम्यान ही घटना घडली. पाचेगाव परिसरातील कोपरा, इरगाव, हिरापूर, पाडळसिंगी येथेही पावसाचे आगमन झाले. गेवराई शहरामध्ये मात्र पावसाचा टिपूसही नव्हता.
आष्टी परिसरातही सरी
आष्टी तालुक्यातील काही भागात सोमवारी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग येणार आहे. आष्टीमध्ये दोन दिवसांपूर्वीच वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. आता पुन्हा एकदा पाऊस झाला. मात्र यावेळी वारे कमी वेगाने वाहत होते.
वडवणीतही हलका पाऊस
वडवणी तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सायंकाळी साडेसात वाजता येथे पावसास सुरूवात झाली. मात्र पावसाला जोर नव्हता. या पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला होता. वातावरणात काहीसा थंडावा जाणवत होता. (प्रतिनिधींकडून)
४० कोंबड्या दगावल्या
गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथे वादळाचा तडाखा बसला. यात आसाराम रडे यांच्या चाळीस कोंबड्या दगावल्या तर १२ क्विंटल खतही भिजले.कडब्याची गंजही उडाली. तसेच पत्र्याचे शेड पडल्याने उत्तम रडे यांच्या हाताला १३ टाके पडले. परिसरात मोठे नुकसान झाले.

Web Title: Strong arrival of rain in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.