सरसंघचालकांची वर्गमित्रांसोबत रंगली गप्पांची मैफल
By Admin | Updated: January 16, 2016 23:16 IST2016-01-16T23:11:28+5:302016-01-16T23:16:03+5:30
हिंगोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांच्या साध्या राहणीमानाबरोबरच जुन्या मित्रांना आवर्जून भेटण्याच्या छंदाचा प्रत्यय हिंगोलीकरांना शनिवारी आला.

सरसंघचालकांची वर्गमित्रांसोबत रंगली गप्पांची मैफल
हिंगोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांच्या साध्या राहणीमानाबरोबरच जुन्या मित्रांना आवर्जून भेटण्याच्या छंदाचा प्रत्यय हिंगोलीकरांना शनिवारी आला. शहरात आगमन झाल्यानंतर भागवत यांनी आपल्या वर्गमित्राचे घर गाठून मनमोकळ्या गप्पा मारल्या.
२०१३ मध्ये मोहन भागवत यांनी हिंगोली भेटीत जुन्या वर्गमित्रांना आमंत्रित करून स्रेहमिलनाचा कार्यक्रम घेतला होता. शनिवारी सायंकाळी आयोजित कयाधूसंगम मेळाव्यासाठी त्यांचे आगमन दुपारी १२.३० वाजताच अमरावती-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेसने शहरात झाले. बियाणीनगरात विभागीय सहसंघचालक शीलचंद्र देशमुख यांच्या निवासस्थानी भोजन व विश्रांती झाल्यानंतर मोहन भागवत दुपारी ३.३० वाजता शास्त्रीनगरात डॉ.पुंजाजी गाडे यांच्या घरी पोहोचले. देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमध्ये भागवत यांचा समावेश असल्याने झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था तैनात होती. त्यामुळे पोलिस ताफ्यासह त्यांची गाडी पोहोचण्यापूर्वीच शास्त्रीनगराकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले होते. सामान्य व्यक्तींना प्रवेश बंद करण्याबरोबरच शेजारी-पाजारी राहणाऱ्यांना दरवाजे बंद ठेवण्याच्या सूचना होत्या. इतकेच नाहीतर आजूबाजूच्या इमारतींवरही शस्त्रधारी पोलिस टेहळणीस होते. पुंजाजी गाडे यांच्या घरी पोहोचल्यानंतर भागवत यांचे सुवासिनींनी औक्षण केले. यावेळी डॉ.पुंजाजी गाडे, प्रा.डॉ.वसंत गाडे व गाडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यानंतर भागवत यांनी बंद खोलीत वर्गमित्रांशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. हिंगोलीत राहणारे व बाहेरगावाहून आलेले सर्व वर्गमित्र मोहन भागवत यांना भेटण्यासाठी एकत्र आले होते. यात डॉ. पुंजाजी गाडे, डॉ. कल्याण काळे, डॉ. अनिल वैद्य, डॉ.कापरे, डॉ.बरवारे, डॉ.भाके, डॉ.झाडे, डॉ.पोपशेटवार,डॉ.मंडलेकर, डॉ.मोतेवार, डॉ.सी.एस. देशपांडे, डॉ.फुलारी, डॉ.पांडे, डॉ.संतान, डॉ.बोरलेटवार, डॉ.सरदेशपांडे, डॉ.केशव लुटे, डॉ.आठवले, डॉ. भालके यांचा समावेश होता.
(प्रतिनिधी)