चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
By Admin | Updated: July 4, 2016 00:18 IST2016-07-04T00:03:42+5:302016-07-04T00:18:03+5:30
उस्मानाबाद : शहरातील आठवडी बाजारात बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देवून मोबाईल चोरांनी आपली ‘हातसफाई’ सुरूच ठेवली आहे़

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
उस्मानाबाद : शहरातील आठवडी बाजारात बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देवून मोबाईल चोरांनी आपली ‘हातसफाई’ सुरूच ठेवली आहे़ शहरातील रविवारच्या आठवडी बाजरात चौघांचे मोबाईल चोरीस गेल्याच्या तक्रारी ठाण्यात धडकल्या आहेत़ तर नाईकवाडी प्लॉटिंगजवळील रस्त्यावरून बार्शीनाक्याकडे जाणाऱ्या एका वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केले़
उस्मानाबाद शहरातील आठवडी बाजारात शहरासह परिसरातील अनेक शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी घेवून येतात़ तर जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील अनेक व्यापारीही आठवडी बाजारात येतात़ रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातील नागरिकांची वर्दळ आणि चोरट्यांचा धुमाकूळ पाहता शहर ठाण्याकडून बंदोबस्त तैनात करण्यात येतो़ मात्र, पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मोबाईल चोरट्यांनी हातोहात सर्वसामान्यांचे मोबाईल लंपास करण्याचा प्रकार मागील वर्षापासून सुरूच ठेवला आहे़ मध्यंतरी थांबलेले मोबाईल चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे़ रविवारच्या आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या गोविंद चव्हाण (रा़ कोथळी ता़उमरगा, ह़मु़बीअॅन्डसी क्वॉर्टर, उस्मानाबाद), धीरज कोल्हे (रा़तांबरी विभाग), विलास सुरवसे (रा़ जहागिरदारवाडी), अविनाश छगनराव चांदणे (रा़ सारोळा) या चौघांचे मोबाईल चोरट्यांनी हातोहात लंपास केले़ याबाबत गोविंद चव्हाण आणि अविनाश चांदणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
उस्मानाबाद शहरातील समता नगर भागात राहणाऱ्या पुष्पा बाळकृष्ण माढेकर (वय-७०) या शनिवारी रात्रीच्या सुमारास बार्शी नाका येथील खासगी दवाखान्यात स्वत:वर उपचार घेण्यासाठी जात होत्या़ नाईकवाडी प्लॉटिंगजवळील मार्गावरून बार्शीनाक्याकडे जात असताना अज्ञात दुचाकीस्वार इसमांनी त्यांच्या गळ्यातील सव्वा लाखाचे चार तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावून नेले़ त्यांनी आरडाओरड केली मात्र, चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते़ याबाबत पुष्पा माढेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि मोतीराम बगाड करीत आहेत़
शहरातील आठवडी बाजारात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मोबाईलची चोरी होत आहे़ तर रात्रीच्यावेळी पेट्रोलिंग असतानाही दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केले आहेत़ बंद झालेले चैन स्नॅचिंगचे प्रकार पुन्हा घडला आहे़ यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देवून आठवडी बाजारातील बंदोबस्त व रात्रीची पेट्रोलिंग वाढवावी अशी मागणी होत आहे़