५० किलो शेतमालाच्या वजनाची कडक अंमलबजावणी करा - खोतकर
By Admin | Updated: June 28, 2017 00:41 IST2017-06-28T00:38:45+5:302017-06-28T00:41:06+5:30
जालना : ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या शेतमालाची हाताळणी, चढ- उतार करण्यास हमाल, मापाडींच्या आरोग्यास घातक असल्याने ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची वजनमाप बाजार समितीत करू नये.

५० किलो शेतमालाच्या वजनाची कडक अंमलबजावणी करा - खोतकर
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या शेतमालाची हाताळणी, चढ- उतार करण्यास हमाल,
मापाडींच्या आरोग्यास घातक असल्याने ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची वजनमाप बाजार समितीत करू नये. याची सर्व व्यापारी, आडतिया, खरेदीदार, हमाल मापाडी आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे.
बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची हाताळणी करणे संबंधितांच्या आरोग्यास घातक ठरणारे असल्याने अशी हाताळणी करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने असे मोजमापच करू नये, असा निर्णय दिला होता.
यामुळे राज्य पणन महासंघाने १ फेब्रुवारी २०१६ रोजी परिपत्रक काढून राज्यातील सर्वच बाजार समितींना आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र याचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. याची गंभीर दखल घेत राज्यमंत्री तथा सभापती अर्जुन खोतकर यांनी या निर्णयात कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा होता कामा नये म्हणून जालना बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. या निर्णयाचे काटेकोरपणे पालन व्हावे या उद्देशाने सभापती खोतकर यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत बाजार समितीतील आडतिया, व्यापारी, हमाल, मापाडी यांना कडक सूचना देत याची १ जुलैपासून बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात १०० किलोऐवजी ५० किलोमध्येच वजनमाप करण्यात यावे. अन्यथा संबंधितांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री खोतकर यांनी स्पष्ट केले.
बैठकीस उपसभापती भास्कर दानवे, सचिव गणेश चौगुले, संचालक मंडळ उपस्थित होते.