विसर्जनासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:15 IST2017-09-04T00:15:02+5:302017-09-04T00:15:02+5:30
गणेश विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदरी घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

विसर्जनासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलीस प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदरी घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यानुसार मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. गणपती विसर्जनासाठी मोती तलाव परिसरात पालिकेच्या वतीनेसुद्धा आवश्यक तयारी करण्यात येत आहे.
गणेश उत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस ठाणे स्तरावर शांतता समिती, ग्रामसुरक्षा दल, पोलीस मित्र व तंटामुक्त समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत अवैध दारू विक्री करणाºया ७३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच चार लाख ९३ हजार ४७० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. १७ जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, दहा जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. गुन्हेगारीसह जातीय तेढ निर्माण करणाºया १०९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. जालना शहरात दरवर्षी विसर्जन मिरवणूक दहा ते बारा तास चालते. यंदा मंगळवारी होणारी मुख्य विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांना दिल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या अंतिम नियोजनाबाबत शोभाप्रकाश मंगल कार्यालयात पोलीस प्रशासनाकडून सोमवारी सायंकाळी आढावा घेण्यात येणार आहे.
मोती तलाव परिसरात तयारी
घाणेवाडी जलाशयात गणेश मूर्ती विसर्जनाला पालिका प्रशासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मोती तलावात विसर्जन केले जाणार आहे. घरगुती गणेश विसर्जनासाठी मोती तलाव चौपाटीवर कृत्रिम हौद बांंधण्यात आला आहे. तलाव चौपाटीवर पालिकेच्यावतीने साफसफाई करण्याचे काम रविवारी दिवसभर सुरू होते. या ठिकाणी सर्वत्र दिवे बसविण्यात येणार असून, तलावात लाईफ गार्डसह जीवरक्षक बोटी तैनात करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.