गावगुंडांवर कठोर कारवाई होणार...
By Admin | Updated: January 23, 2017 23:47 IST2017-01-23T23:45:29+5:302017-01-23T23:47:23+5:30
उस्मानाबाद : सन २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे़

गावगुंडांवर कठोर कारवाई होणार...
उस्मानाबाद : सन २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे़ गुन्ह्यांच्या उलगड्यातही जिल्ह्याचा चांगला आलेख आहे़ कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत़ शहरी- ग्रामीण भागात तणावाचे वातावरण निर्माण होण्यास कारणीभूत असलेल्या गावगुंडांसह निवडणुकीत कायदा हातात घेणाऱ्या राजकीय गुंडांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी दिली़
उस्मानाबाद येथील पोलीस मुख्यालयात सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ पाटील म्हणाले, डिसेंबर १६ अखेरपर्यंत दाखल खुनाच्या ४४ घटनांपैकी ३८ प्रकरणांचा उलगडा झाला असून, याचे प्रमाण ८६ टक्के आहे़ तर गतवर्षीच्या उलगड्याच्या प्रमाणात पाच टक्क्यांनी यात वाढ झाली आहे़ सदोष मनुष्यवधाच्या दाखल दोन्हीही प्रकरणांचा उलगडा झाला आहे़ खुनाच्या प्रयत्नाच्याही सर्वच्या सर्व प्रकरणांचा उलगडा झाला आहे़ या घटनांमध्ये दोनने घट झाली आहे़ दरोड्याच्या घटनांमध्येही चांगली घट झाली असून, दाखल सर्वच प्रकरणांचा उलगडा झाला आहे़ चोरी, जबरी, चोरी, घरफोड्या, इतर चोऱ्यांच्या घटनांमध्येही यंदा घट झाली आहे़ असे असले तरी या घटना उलगडा होण्याचे प्रमाण समाधानकारक नाही़ इतर प्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यांचा उलगडा होण्याचे प्रमाण हे २०१५ पेक्षा २०१६ मध्ये चांगले दिसून येत आहे़ २०१५ मध्ये ३७९५ जणांविरूध्द विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती़ तर २०१६ मध्ये यात मोठी वाढ झाली असून, ५७९० जणांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ शिवाय अवैध धंद्यांविरूध्दही कारवाईत मोठी वाढ झाली आहे़
दोष सिध्दतेत १८ प्रकरणांमध्ये शिक्षा झाली असून, यात आठ खुनाच्या घटनांचा समावेश असल्याचेही पाटील यांनी सांगितले़ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीही प्रशासन प्रयत्न करीत आहे़ निवासस्थाने, पोलीस ठाण्याच्या नवीन इमारती, वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठीही शासनदरबारी प्रशासनाचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली़ यावेळी अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे, सहाय्यक पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर आदी उपस्थित होते़(प्रतिनिधी)