खरे उत्पन्न दाखवा नसता कडक कारवाई
By Admin | Updated: June 30, 2016 01:24 IST2016-06-30T00:58:33+5:302016-06-30T01:24:05+5:30
औरंगाबाद : सव्वाशे कोटींच्या देशात फक्त दीड लाख करदातेच आपले उत्पन्न ५० लाखांपेक्षा अधिक दाखवीत आहेत. अनेक जण आपले उत्पन्न कमी दाखवून आयकर विभागच नव्हे

खरे उत्पन्न दाखवा नसता कडक कारवाई
औरंगाबाद : सव्वाशे कोटींच्या देशात फक्त दीड लाख करदातेच आपले उत्पन्न ५० लाखांपेक्षा अधिक दाखवीत आहेत. अनेक जण आपले उत्पन्न कमी दाखवून आयकर विभागच नव्हे तर देशाला फसवत आहेत. आय प्रकटीकरण योजनेंतर्गत आपले अघोषित उत्पन्न जाहीर करून निश्चिंत व्हा, नसता ३० सप्टेंबरनंतर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुख्य आयकर आयुक्त अंबरिशचंद्र शुक्ला यांनी दिला.
आयसीएआय, सीएमआयए, मासिआ, जिल्हा व्यापारी महासंघ, आयका यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी आयकरदात्यांना इशारा दिला. सातारा परिसरातील आयसीएआय भवन येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य आयकर आयुक्त अंबरीशचंद्र शुक्ला, प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर सीएमआयएचे अध्यक्ष गुरुप्रीतसिंग बग्गा, मासिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे विजय शर्मा, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कासलीवाल यांची उपस्थिती होती. आयकर आयुक्तांचे स्वागत आयसीएआयच्या अध्यक्षा रेणुका देशपांडे, सचिव गणेश शीलवंत यांनी केले. अंबरीशचंद्र शुक्ला यांनी सांगितले की, जेव्हा श्रीराम सीतेला लंकेतून आणण्यासाठी समुद्रकाठावर येतात, तेव्हा श्रीराम समुद्रदेवतेला विनंती करतात की, आम्हाला लंकेत जाण्यासाठी मार्ग तयार करून द्या. तीन दिवस प्रतीक्षा करूनही समुद्रदेवता प्रकट होत नाही. तेव्हा श्रीराम अग्निबाण काढून समुद्रच कोरडा करण्याचा इशारा देतात. हा रामायणातील प्रसंग सांगून शुक्ला म्हणाले की, ३० सप्टेंबरपर्यंत अघोषित उत्पन्न व संपत्ती आयकर विभागाकडे दाखवा. त्यानंतर कोणी आपले खरे उत्पन्न, संपत्तीची माहिती लपविल्याचे आढळून आले तर त्यांना आयकर विभागाच्या कारवाईरूपी अग्निबाणाला सामोरे जावे लागेल. सहआयुक्त संदीप साळुंके यांनी प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. संचालन किशोर मालपाणी यांनी केले.