आरोग्य यंत्रणेवरील ताण बऱ्याच दिवसांनंतर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:03 IST2021-04-30T04:03:27+5:302021-04-30T04:03:27+5:30
औरंगाबाद : प्रशासनाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात यश येत असल्याचे चित्र आहे. मागील काही ...

आरोग्य यंत्रणेवरील ताण बऱ्याच दिवसांनंतर कमी
औरंगाबाद : प्रशासनाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात यश येत असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांत होम आयसोलेशनद्वारे घरीच उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ७० टक्क्यांनी कमी झाली आहे, तर दुसरीकडे वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागल्याने महापालिकेच्या कोविड केअर सेंटर्ससह घाटी व जिल्हा सामान्य रुग्णालय, खासगी रुग्णालयांवरील भारही कमी झाला आहे.
महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सरकारी रुग्णालयांसह खासगीतही बेड्सची कमतरता निर्माण झाली होती. कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते. पालिका व जिल्हा प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर दिला. कोरोना लसीकरणाची मेगा मोहीम राबवित असतानाच कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले, सिटी एन्ट्री पॉईंटवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना अँटिजेन चाचणी सुरू केली. औरंगाबाद विमानतळ व रेल्वे स्टेशनवरही बाहेरील प्रवाशांची चाचणी सुरू केली.
राज्य सरकारनेही कडक निर्बंध लागू करत बाजारपेठ बंद केली. १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन जारी केला. आता हा लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. प्रशासनाच्या सर्व उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. त्यामुळेच दीड हजारापार गेलेला कोरोना रुग्णवाढीचा आलेख आता हजाराच्या आत आला आहे. परिणामी, सरकारी व खासगी सर्वच रुग्णालयांत आता नव्याने येणाऱ्या रुग्णांना बेड्स उपलब्ध होऊ लागले आहेत. शहरात महिनाभरापूर्वी घरीच होम आयसोलेशनद्वारे उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ही ५ हजारांच्या घरात केली होती. ती आता दीड हजारावर आली आहे. २७ मार्च रोजी शहरात घरीच उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या ४,९९४ एवढी होती. ती २७ एप्रिल रोजी १,५०९ पर्यंत खाली घसरली आहे. जवळपास ७० टक्क्यांनी होम आयसोलेशनच्या रुग्णांत घट झाली आहे.
शहरात दाखल रुग्णांत झालेली घट...
रुग्णालय - २७ मार्च - २७ एप्रिल
घाटी रुग्णालय ५१८ - ३००
सिव्हिल रुग्णालय १५८ - १२०
मेल्ट्रॉन रुग्णालय ३१० -३३०
खासगी रुग्णालये २,५२८ -१,२९७
मनपा कोविड सेंटर्स २,७१८ -१,२२७
होम आयसोलेशन ४,९९४ -१,५०९