दवाखान्याची इमारत मोडकळीस; रूग्णांचे हाल
By Admin | Updated: June 27, 2014 00:16 IST2014-06-26T23:46:08+5:302014-06-27T00:16:11+5:30
सेनगाव : येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीचे काम मागील पाच वर्षापासून अर्धवट अवस्थेत रखडत पडले

दवाखान्याची इमारत मोडकळीस; रूग्णांचे हाल
सेनगाव : येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीचे काम मागील पाच वर्षापासून अर्धवट अवस्थेत रखडत पडले असून याचा त्रास तालुक्यातील रुग्णांना सोसासा लागत आहे. केवळ इमारत नसल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात संपूर्ण वैद्यकीय सेवा मिळत नसून नाईलाजाने आर्थिक क्षमता नसलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे.
सेनगाव येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय जवळपास १७ वर्षापुर्वी कार्यान्वित झाले होते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत संसार थाटलेल्या ग्रामीण रुग्णालयात शासन निधी उपलब्ध झाला. मात्र केवळ बांधकाम विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे स्वतंत्र इमारतीपासून वंचित रहावे लागत आहे. सेनगाव ग्रामीण रुग्णालयाबरोबर कार्यान्वित झालेल्या सर्व ग्रामीण रुग्णालयांच्या स्वतंत्र टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या.
३० खाटाच्या रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवित १०० वर गेली असताना सेनगाव ग्रामीण रुग्णालयाच्या पदरी मात्र मोडकळीस आलेल्या इमारतीत जीव मुठीत धरून उपचार करण्याची वेळ आली आहे. फरशा उखडल्या तर भिंतीला तडे गेले असून पावसाळ्यात छताला गळती लागत आहे. अशा कालबाह्य झालेल्या अपुऱ्या जागेत सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालू आहे. ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात दहा खाटा ठेवण्यासाठीही जागा नसल्याने बाह्यरुग्ण विभाग चालवून उपचार करण्याची नामुष्की ग्रामीण रुग्णालयावर आली आहे. वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांना रुग्णालयात बसण्यासाठी जागा नाही, मिळेल त्या ठिकाणी बसून औषधोपचार, तपासणी करावी लागते. दररोज ८० ते १०० रुग्णांची ‘ओपीडी’ असणाऱ्या दुर्गम भागात असलेल्या या रुग्णालयात जागेअभावी भौतिक सुविधा, संपुर्ण वैद्यकीय सेवाही मिळत नाही.
गंभीर रुग्णाला ठेवण्यासाठी सुसज्ज असा आंतररुग्ण विभाग नसल्याने त्याला जीव मुठीत धरीत हिंगोली शहर गाठावे लागते. नशीब चांगले तरच वाचला, अशी गंभीर अवस्था आहे. ग्रामीण रुग्णालयात आयोजित कुटूंबकल्याण शिबिरात सहभागी महिलांची इमारतीअभावी मोठी हेळसांड होते.
जिथे रुग्णांसाठी इमारत नाही तिथे कर्मचाऱ्यांचा तर विषयच नाही. मोडकळीस आलेल्या या इमारतीचा कोणता भाग केव्हा कोसळेल? याचा नेम नाही. अशा स्थितीतील या इमारतीतून रुग्णालयाचा कारभार चालू असताना दुसरीकडे पाच वर्षांपासून रुग्णाच्या इमारतीचे काम अर्धवट अवस्थेत पडले आहे. या संबंधी सार्वजनिक बांधकाम विभाग तातडीने कार्यवाही करीत नसताना जबाबदारी लोकप्रतिनिधी आमदार- खासदारांच्या नजरेत ही समस्या येत नसून प्रशासनस्तरावरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपुर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष केले. पाच वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम केव्हा पुर्ण होणार? याचे उत्तर बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडेही नाही. (समाप्त)