पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवून संघटन मजबूत करा
By Admin | Updated: July 6, 2015 00:19 IST2015-07-05T23:55:57+5:302015-07-06T00:19:43+5:30
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करावे़ शरद पवार यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे मत विधीमंडळाचे गटनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवून संघटन मजबूत करा
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करावे़ शरद पवार यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे मत विधीमंडळाचे गटनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमंत्रितांच्या मेळाव्याच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी व्यक्त केले़
व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ़ सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, माजी आ़जयप्रकाश दांडेगावकर, माजी खा़ गणेशराव दूधगावकर आदींची उपस्थिती होती़
मराठवाडा दुष्काळाच्या खाईत आहे़ पाण्याचे भीषण संकट आहे़ कृष्णा खोरेचे हक्काचे २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली़ त्याची अंमलबजावणी सध्याच्या सरकारने केली पाहिजे. शेतकऱ्यांना पूर्वी दिले जाणारे ८० हजार कोटींचे पीक कर्ज शरद पवार हे कृषीमंत्री झाल्यावर ८ लाख कोटीपर्यंत पीक कर्ज देण्याची योजना सुरु केली़ सध्याचा गंभीर दुष्काळ असतानाही सरकारने कुठलीही उपाययोजना केली नसल्याचे अजित पवार म्हणाले. यापुढील काळात प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार दिसले पाहिजेत़ जनतेच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन छेडले पाहिजे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अल्पसंख्यांकाचे विरोधक असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय मेळाव्यात केला़ मुस्लिम आरक्षणाच्या कायद्याला मोदी सरकारने बगल दिली आहे़ रमजान ईदच्या शुभेच्छा द्यायलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी विसरले आहेत़ देशाचा पंतप्रधान हा समाजातील सर्वच घटकांचा असतो़ एका विशिष्ट समाजाच्या सणावारासाठी शुभेच्छा देणारे पंतप्रधान मोदी हे अल्पसंख्यांक धर्माच्या सणाला मात्र शुभेच्छा देत नाहीत. ते अल्पसंख्यांकविरोधी आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी माजी अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षाने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचविले पाहिजे़ येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जय्यत तयारी केली पाहिजे़ गेल्या दहा वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वाधिक राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले़ शंकरअण्णा धोंडगे म्हणाले, कृषीमंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी मालाला आधारभूत भाव दिला आहे़
यावेळी राष्ट्रवादीचे माजी खा़डॉ़ जनार्दन वाघमारे, माजी मंत्री आ़ राणा जगजितसिंह पाटील, आ़ अमरसिंह पंडित, आ़विक्रम काळे, आ़राहूल मोटे, माजी मंत्री फौजिया खान, एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे आदींसह मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)