रस्त्यांवर अंधार कायम
By Admin | Updated: October 9, 2014 00:51 IST2014-10-09T00:46:24+5:302014-10-09T00:51:28+5:30
औरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. दिवाळीचा सण जवळ येत आहे, तरीही पथदिव्यांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे.

रस्त्यांवर अंधार कायम
औरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. दिवाळीचा सण जवळ येत आहे, तरीही पथदिव्यांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे. पथदिव्यांसाठी ११२ कोटी रुपयांतून बीओटीवर मनपाने कं त्राट दिले आहे. मात्र, ते काम अजून कागदावरच आहे.
एन-५, बजरंग चौक ते बळीराम पाटील चौक, औरंगपुरा ते बाराभाई ताजिया, शहागंज ते सिटीचौक, टिळकपथ ते गुलमंडी, निराला बाजार ते जि.प. मैदानापर्यंत या मुख्य रस्त्यांवरील अनेक पथदिवे बंद आहेत, तसेच पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर ते शिवाजी चौक, एन-१२ सिडको- हडकोतील रस्त्यांवर पथदिवे बंद आहेत.
मनपाने ११२ कोटी रुपयांचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम्स प्रा.लि. आणि पॅरागॉन केबल इंडिया या संस्थेला दिले आहे. जुन्या विनवॉक कंपनीकडून सर्व पथदिवे सुरू करून घेतल्यानंतरच वरील कंपनी काम सुरू करील. मनपाने ११ नोव्हेंबरपर्यंत विनवॉक कंपनीला मुदत दिली आहे. शहरातील रस्ते दिवाळीमध्ये तरी प्रकाशमान होणार की नाही, हे पालिकेला सांगणे सध्या तरी अवघड आहे.
आचारसंहितेमुळे सर्वांचे दुर्लक्ष
आचारसंहितेमुळे बंद पथदिव्यांकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहेत, तर अधिकारी निवडणुकीच्या कामात आहेत. वॉर्डातील पथदिव्यांसाठी १३ ठेकेदार काम करतात. सिडको व शहरातील मुख्य रस्त्यांसाठी बीओटीवर कंत्राट देण्यात आले होते.
सिडकोतील ५ हजार व शहरातील ५ हजार पथदिवे होते. बीओटीचा करार संपला आहे.
सर्व पथदिवे बीओटीच्या कंत्राटदाराकडून सुरू करून घेतल्यानंतर सर्व यंत्रणा हस्तांतरित करून घेण्यात येईल. पथदिवे सुरू होत नाहीत, तोवर विनवॉककडून मनपा यंत्रणा ताब्यात घेणार नाही, असे विद्युत विभागाचे उपअभियंता पी.आर. बनसोडे यांनी सांगितले.