शहरातील नाले ठरताहेत जीवघेणे!
By Admin | Updated: June 11, 2014 00:33 IST2014-06-11T00:10:25+5:302014-06-11T00:33:19+5:30
जालना: शहरात कुंडलिका व सीना नद्यांना जाऊन मिळणाऱ्या एकाही नाल्याभोवती संरक्षक भिंत नसल्याने हे नाले जीवघेणे बनले आहेत.

शहरातील नाले ठरताहेत जीवघेणे!
जालना: शहरात कुंडलिका व सीना नद्यांना जाऊन मिळणाऱ्या एकाही नाल्याभोवती संरक्षक भिंत नसल्याने हे नाले जीवघेणे बनले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांनी तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या धोकादायक नाल्यांवर संरक्षण भिंती तसेच इतर पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, नेहमीप्रमाणे ते हवेतच विरले.
शहरातील प्रमुख मार्गांच्या वळणावर, रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी सांडपाण्याचे मोठ-मोठे नाले आहेत. हे नाले आता धोकादायक अवस्थेत आहेत. पावसाळ्यात या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. रस्ता आणि नाली याचा अंदाज न आल्याने अपघातांच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. एवढे होऊनही पालिकेला अद्याप जाग आलेली नाही.
शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र जुने शहर म्हणून ओळख असलेल्या भागात काही ठिकाणी नाले आहेत. या नाल्यांवरून मुख्य रस्ते गेल्याने तेथून सतत वाहतूक सुरू असते. मात्र या नाल्यांभोवती संरक्षण भिंती तयार न झाल्याने हे नाले धोकादायक बनले आहेत.
औरंगाबाद मार्गावरील संजयनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला नाला आहे. विशेष म्हणजे हा राज्य मार्ग आहे. या नाल्याभोवती झाडीही असल्याने पावसाळ्यात रस्ता आणि नाला कोणता ? हे वाहनधारकांना किंवा पादचाऱ्यांनाही लवकर लक्षात येत नाही. रस्त्यावरून वळण घेताना वाहन घसरून थेट या नाल्यातच जाते. अशा अपघाताने काही जणांचा बळी गेलेला आहे.
औरंगाबाद मार्गावरच भोकरदन नाका परिसरात अशाच प्रकारचा नाला आहे. त्यामुळे तेथेही अपघातांच्या घटना घडल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. नूतन वसाहतीकडून शनि मंदिराकडे येणाऱ्या उड्डाणपुलाखालील रस्त्याखाली मोठा धोकादायक नाला आहे. नाल्याभोवती कठडे, संरक्षण भिंत किंवा कसलेही सांकेतिक चिन्ह नसल्याने उड्डाणपूलावरून भरधाव वेगाने एखादे वाहन थेट या नाल्यात जाऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याही नाल्याकडे पालिकेने दुर्लक्षच केले. टाऊनहॉल येथून घायाळनगरकडे जाणारा रस्ता नाल्यावरून जातो. येथे छोटा सिमेंट पूल तयार केलेला आहे. मात्र त्याला कठडेच नसल्याने हा पूल अत्यंत धोकादायक आहे. मंगळबाजार परिसरातील गुरूगोविंद सिंगनगर भागातील नालाही जीवघेणा बनला आहे. टांगा स्टँड येथून बडीसडक येथे जाणारा रस्ताही नाल्यावर आहे. या नाल्याभोवतीही कठडे नसल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. औरंगाबाद मार्गावर एका शोरूमजवळील नालाही धोकादायक अवस्थेत आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात दिवे नसल्याने मोठ्या अपघाताचा धोका आहे. (प्रतिनिधी)
पालिका प्रशासन लक्ष घालणार ?
या नाल्यांना संरक्षक भिंती बांधण्याचे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, अनेक महिन्यांपासून याकडे लक्ष देण्यात आले नाही. पावसाळ्यात या नाल्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच या ठिकाणी सुरक्षिततेचे उपाय योजावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शहरात काही नाल्यांमध्येही अतिक्रमणे होत आहेत. मात्र त्याकडे पालिका प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. याकडेही पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
जेव्हापासून या नाल्यांवर रस्ते तयार करण्यात आले, तेव्हापासून नाल्यांभोवती संरक्षण भिंत अथवा कठडे बसविण्यात आले नसल्याने ते धोकादायक अवस्थेत आहेत.