हट्टा अवैध वाळू साठ्यांचे भांडार
By Admin | Updated: July 8, 2014 00:36 IST2014-07-07T23:51:44+5:302014-07-08T00:36:55+5:30
वसमत : तालुक्यात रेती माफिये उदंड झाले असून जागोजागी वाळू साठवूण ठेवण्याचा सपाटा लावला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
हट्टा अवैध वाळू साठ्यांचे भांडार
वसमत : तालुक्यात रेती माफिये उदंड झाले असून जागोजागी वाळू साठवूण ठेवण्याचा सपाटा लावला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परिणामी हट्टा परिसरात सर्वाधिक अवैध वाळूचासाठा झाला असून राष्ट्रीय महामार्गाशेजारीही वाळू साठवणूक केंद्र दिसून येत आहेत.
वसमत तालुक्यातील हट्टा मंडळातील माटेगाव, ढऊळगाव, सोन्ना, ब्राम्हणगाव या भागातील वाळू घाटांचा लिलाव झालेला आहे. या घाटांवरून रात्रंदिवस वाळूचा उपसा सुरू आहे. घाटांवरील वाळू खरेदी करून ती साठवून ठेवण्याचा व्यवसाय हट्टा परिसरात जोर धरत आहे. हट्टा परिसरातील वाळूचे साठे पाहता या भागास वाळू साठवण्याचे परवाना मिळाले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जागोजागी रस्त्याच्या कडेला शासकीय जागेतही वाळू साठवल्याचे चित्र हट्टा परिसरात पहावयास मिळत आहे. रविवारी हट्टा परिसरात ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पाहणी केली असता झिरोफाटा- हट्टा रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ हजारो ब्रास वाळू साठवल्याचे पहावयास मिळाले. या शिवाय हट्टा जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात तीन ठिकाणी वाळूची साठवणूक आहे. सावंगी रस्त्यावरील जिनिंग फॅक्टरीजवळ, कॅनाल शेजारी, करंजाळा रस्ता, माटेगाव रस्ता या भागातही प्रचंड प्रमाणात वाळू साठवली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी खेरीज वाळूचा साठा करता येत नाही. असा नियम असतानाही हट्टा परिसरात मोठ्या प्रमाणावर रेतीचासाठा कसा होत आहे? हे समजण्यास मार्ग नाही. हट्टा सज्जाचे तलाठी, मंडळ अधिकारी सज्जाकडे फिरकत नाहीत. त्याचाच फायदा हे वाळू माफीया घेत असल्याचे हट्टा परिसराचे चित्र आहे. वसमत परिसरातही नांदेड- परभणीहून तीन ते साडेतीन ब्रास वाळू घेवून येणारे महाकाय टिप्पर दाखल होत आहेत. वसमत येथील प्रियदर्शनी उद्यानाजवळच वाळूच्या ट्रकची रांग लागत आहे. पुर्णा परिसरातूनही रेतीचे टिप्पर, ट्रक कारखाना रोडने रात्री-अपरात्री शहरात दाखल होत आहेत. वसमत येथील वाळूचे व्यावसायीक नांदेडहून आलेल्या वाळूचा साठा करून दाम दुप्पटीने वाळू विक्री करत आहेत. अशा साठेबाजांरावर आजवर महसूल विभागाने काहीही कारवाई केली नसल्यामुळे वाळू माफिया निर्धास्त आहेत. वसमत येथील बहिर्जी कॉलेज रोड, जवळा खंदारबन रोड, ईदगाह रस्ता, नगर पालिका परिसर आदी भागात वाळूचे साठे झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गत पंधरवाड्यात आरटीओने वाळूचे ओव्हरलोड ट्रकची धरपकड मोहिम राबवून दंड वसूल केला होता; परंतु ही मोहिम आता बंद पडल्याने आता पुन्हा नांदेडकडून वाळूचे ट्रक वसमतमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. (वार्ताहर)