विचित्र अपघातात 7 गाड्या आदळल्या एकमेकांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 16:21 IST2017-03-11T16:21:32+5:302017-03-11T16:21:32+5:30

मोंढा नाका उड्डाणपुलावर शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास 10 मिनिटांच्या अंतरात दोन वेगवेगळे विचित्र अपघात झाले.

In a strange accident, 7 cars have collapsed each other | विचित्र अपघातात 7 गाड्या आदळल्या एकमेकांवर

विचित्र अपघातात 7 गाड्या आदळल्या एकमेकांवर

 ऑनलाइन लोकमत/बापू सोळुंके 

औरंगाबाद, दि. 11 - मोंढा नाका उड्डाणपुलावर शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास 10 मिनिटांच्या अंतरात दोन वेगवेगळे विचित्र अपघात झाले.  पहिल्या अपघातात तीन कार आणि एक दुचाकी एकमेकांवर आदळल्याने एक दुचाकीचालक जखमी झाला. तर दुस-या अपघातात तीन कार ऐकमेकांवर धडकल्या. सुदैवाने या अपघातांत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  
 
या अपघातात निशांत गजानन भवर (वय १९)  दुचाकीस्वार जखमी झाला. या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी मोंढा नाका उड्डाणपुलाखाली वाहतूक पोलीस नियम तोडून पळणा-या वाहनचालकांवर कारवाई करीत होते. यावेळी अमरप्रीत चौकाकडून आकाशवाणीकडे जाणारे वाहनचालक वाहने थांबवून पुलाखाली सुरू असलेली कारवाई पहात होते. याचवेळी आकाशवाणीकडून अमरप्रीत चौकाकडे उड्डाणपुलावरुन जाणा-या वाहनचालकांनी लोक खाली का डोकावत असल्याचे दिसल्याने एका कारचालकाने त्यांच्या वाहनांचा वेग कमी केला. त्यांच्यामागून संतोष मगरे (रा.चिकलठाणा एमआयडीसी)हे शासकीय कर्मचारी त्यांच्या कारने (एमएच-२०बीवाय ३०२१) ड्युटीवर जात होते. तर मगरे यांच्यामागे शेतकरी संतोष जैस्वाल (रा. सिडको एन-७)यांची कार(क्रमांक एमएच-२०डीव्ही ८११८)होती. 
 
जैस्वाल यांच्यामागे सिराज कादर (रा. उस्मानपुरा) हे त्यांच्या फॉर्च्युनर कारने वेगात जात होते. यावेळी चढावरून वेगात पुलावर आलेल्या सिराज यांच्यासमोरील वाहनांचा वेग कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यानंतरही त्यांची कार जैस्वाल यांच्या कारवर जोरात जाऊन आदळली. जैस्वाल यांच्या गाडीला मागून जोराचा धक्का बसतातच जैस्वाल यांची कार अग्रभागी असलेल्या मगरे यांच्या कारला धडकली. 
 
सिराज यांच्या कारमागे असलेल्या दुचाकीचालक निशांत यानेही दुचाकीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची दुचाकीही वेगात असल्याने तो दुचाकीसह सिराज यांच्या कारला मागून धडकला. या अपघातात निशांतला जबर मार लागला आणि  दुचाकी कारच्या मागील बाजूने घुसली आणि अडकली. सुदैवाने कारमधील चालकांना आणि प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या मदतीने दुचाकी कारमधून बाजूला केली. जखमीला रुग्णालयात पाठविले. 
 
दहा मिनिटानंतर तीन कारचा अपघात
या अपघाताला दहा ते बारा मिनिट होत असतानाच पुलावर दुसरा विचित्र अपघात झाला. या घटनेतही तीन कार ऐकमेकांना मागून धडकल्या. सुदैवाने या अपघातातही कोणतीही जीवितहानी झाली नाही.  
 

Web Title: In a strange accident, 7 cars have collapsed each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.