वादळाने ८७८ खांब जमीनदोस्त
By Admin | Updated: June 6, 2014 01:03 IST2014-06-06T00:27:20+5:302014-06-06T01:03:51+5:30
बीड: बुधवारी जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या जोरदार वार्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले. आष्टी तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यात एकूण ८७८ विद्युत खांब आडवे झाले.
वादळाने ८७८ खांब जमीनदोस्त
बीड: बुधवारी जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या जोरदार वार्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले. आष्टी तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यात एकूण ८७८ विद्युत खांब आडवे झाले.
३३ के.व्ही. उपकेंद्रात विद्युत वाहिनीचे १०८, ११ के.व्ही.चे १८१ तर लघुदाबाचे ५८९ खांब जमीनदोस्त झाले. या शिवाय दोन रोहीत्रही कोसळले. अंबाजोगाई येथील केंद्रीय पॉवर ग्रीड उपकेंद्रातून पुण्याकडे जाणार्या ४०० के.व्ही. अतिउच्च वाहिनीचे मनोरे आष्टी तालुक्यात कोसळले. त्यामुळे बुधवारी रात्री आष्टी तालुका अंधारात होता. दुरूस्तीचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे. गुरुवारी आष्टी शहरातील एका उपकेंद्राची वाहिनी दुरूस्त झाली. मात्र अद्यापही ११ के.व्ही. वाहिन्या बंद आहेत. लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता बी.बी. पाटील, बीडचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे हे सर्वपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दुरूस्ती काम वेगाने पूर्ण करण्यावर भर असून दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी दिली. सहकार्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
अंबाजोगाईत वीज पडून युवक ठार
येथील काळवटी तांडा परिसरात वीज पडून एक तरूण ठार झाला़ ही दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली़ कमलाकर किसन घोलप (वय २८ रा़ काळवटी तांडा, अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे़ ते बुधवारी सायंकाळी काळवटी तांडा परिसरात फिरण्यासाठी गेला होता. बुधवारी सायंकाळी ६.५५ च्या सुमारास पाऊस व विजांचा कडकडाट सुरू झाल्यामुळे कमलाकर व त्याचा मित्र आंब्याच्या झाडाखाली थांबले. त्यानंतर आकाशात कडाडणारी वीज थेट झाडावर कोसळली. या दुर्घटनेत तो गंभीर भाजल्याने स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ उपचार सुरू असताना बुधवारी रात्री त्याचे निधन झाले. याप्रकरणी रंगनाथ घोलप यांच्या खबरीवरून शहर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे़