लक्ष्मीपूजनाआधीच्या रविवारी बाजारात तुफान गर्दी; कोट्यवधींच्या उलाढालीने आनंदी आनंद

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 6, 2023 03:20 PM2023-11-06T15:20:25+5:302023-11-06T15:20:55+5:30

आकाशकंदील, रेडिमेड कपडे, साड्या खरेदीला प्राधान्य; दिवाळीआधीचा रविवार असल्याने शहरवासीयांनी मनसोक्त खरेदी उत्सव साजरा केला

Storm rush in market on Sunday before Lakshmi Puja; Blissful bliss with billions in turnover | लक्ष्मीपूजनाआधीच्या रविवारी बाजारात तुफान गर्दी; कोट्यवधींच्या उलाढालीने आनंदी आनंद

लक्ष्मीपूजनाआधीच्या रविवारी बाजारात तुफान गर्दी; कोट्यवधींच्या उलाढालीने आनंदी आनंद

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस पुढील रविवार असून त्या दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाईल. त्याआधीचा शेवटचा रविवार असल्याने आज बाजारपेठेत शहरवासीयांनी ‘खरेदी उत्सव’ साजरा केला. सकाळपासून सुरू झालेली गर्दी रात्री ११ वाजेपर्यंत टिकून होती.

बाजारपेठेत बोनसचा पैसा येऊ लागला आहे. पगाराला हात न लावता ग्राहक बोनसच्या रकमेतूनच दिवाळीची खरेदी करत आहेत. औद्योगिक वसाहतीत बोनसची मोठी रक्कम मिळाली आहे. आज संपूर्ण कुटुंब खरेदीसाठी बाजारात आले होते. रेडिमेड कपडे खरेदीवर जास्त भर होता. लहान मुलांच्या ड्रेसच्या शोरूममध्ये तर एवढी गर्दी झाली की, बाहेर रांगा लावण्यात आल्या होत्या. काही दुकानांमध्ये ग्राहकांना नंबर देण्यात आले होते. एवढी गर्दी बाजारात उसळली होती. कोणी रेडिमेड ड्रेस खरेदी करीत होते, कोणी आकाशकंदील, तर कोणी विद्युत माळा खरेदी करताना दिसून आले. एवढेच नव्हे तर अगरबत्ती, धूप, पणत्याही खरेदी केल्या जात होत्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची (लक्ष्मीरूपात) पूजा केली जाते. यामुळे आवर्जून झाडू खरेदी केली जात होती. बाजारपेठेत सर्वत्र गर्दीच गर्दी पाहण्यास मिळाली. रात्री ११ वाजेपर्यंत बाजारपेठेत खरेदीचा उत्सव सुरू होता.

मध्यरात्री ३ वाजता व्यापारी, कर्मचारी घरी
आज रविवारचा दिवस उलाढालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. बाजारात ग्राहकांनीही मनसोक्त खरेदी केली. दुकानात गर्दी जरी असली तरी तास, दीड तास थांबून अखेर नंबर आल्यावर कपडे खरेदी केले जात होते. रात्री ११ वाजता शोरूमचे शटर खाली झाले तरी दुकानात कर्मचारी कपड्यांच्या घड्या घालून ठेवण्याचे काम करीत होते. बड्या शोरूममधील कर्मचारी मध्यरात्री ३ वाजता घरी गेले.

दिवसभरात २५० कोटींची उलाढाल
दिवाळीआधीचा रविवार असल्याने आज बाजारपेठेत अपेक्षितरीत्या उलाढाल झाली. प्रथम अंदाजानुसार आकाशकंदील ते कारपर्यंत अशी २५० कोटींची उलाढाल झाली असावी, अशी शक्यता आहे.
- लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

आता पुढील दिवस महत्त्वाचे
वर्षभरातील उलाढालीपैकी दिवाळीत होणारी उलाढाल ही ५० टक्क्यांपर्यंत असते. यामुळे व्यापाऱ्यांसाठी दिवाळीचे दिवस सर्वाधिक महत्त्वाचे असतात. येत्या आठवड्यात बाजारात आणखी ५०० ते ७०० कोटींची उलाढाल होईल.
- शिवशंकर स्वामी,महासचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

Web Title: Storm rush in market on Sunday before Lakshmi Puja; Blissful bliss with billions in turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.