दुकान फोडून दीड लाख पळविले
By Admin | Updated: August 7, 2014 01:27 IST2014-08-07T00:32:32+5:302014-08-07T01:27:18+5:30
परभणी: दुकानाचे शटर वाकवून नगदी एक लाख ४५ हजार रुपये पळविल्याची घटना घडली.

दुकान फोडून दीड लाख पळविले
परभणी: शहरातील जुन्या मोंढ्यामध्ये दुकानाचे शटर वाकवून नगदी एक लाख ४५ हजार रुपये पळविल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तपास सुरु आहे.
शहरातील जुना मोंढा भागात असलेले दुकान फोडण्याचे प्रयत्न ६ आॅगस्टच्या पहाटे झाले. जुन्या मोंढ्यामध्ये मणियार ट्रेडर्स नावाचे होलसेलचे दुकान आहे. या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश मिळविला आणि दुकानातील गल्ल्यामधील १ लाख ४५ हजार रुपये काढून घेतले. यात १ हजार, ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा आहेत. या भागात असलेल्या इतर दुकानातही चोरीचा प्रयत्न झाला. येथील अ. कुरेशी यांच्या हार्डवेअरच्या दुकानाचे शटरही वाकविण्यात आले. तर त्याच शेजारी असलेल्या अ.कादर यांच्या दुकानाचे शटरही चोरट्यांनी वाकवून चोरीचा प्रयत्न केला. परंतु, या दोन्ही दुकानातून काहीही चोरीला गेले नाही. या प्रकरणी महमद नूर महमद सरवर यांच्या फिर्यादीवरुन नानलपेठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक आणि नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाला भेट देण्यात आली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. जी. कोल्थे, बीट जमादार विठ्ठल राठोड, विनोद मुळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद
मणियार ट्रेडर्स या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली कार्यान्वित आहे. या कॅमेऱ्यात दोन चोरटे कैद झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळेच हा प्रकार पहाटे ४.५० वाजेच्या सुमारास झाल्याचे स्पष्ट झाले. दोन चोरट्यांनी जॅक लावून शटर वाकविले असून आतमध्ये प्रवेश करुन ही चोरी केली. ३० ते ३२ वयोगटातील ही चोरटी आहेत. त्यापैकी एकाने पगडी घातल्याचे कॅमेऱ्यात दिसत आहे.
पथक रवाना
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले चोरटे जिल्ह्याबाहेरील असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे नांदेड आणि परतूर या ठिकाणी पोलिस पथक तपासासाठी रवाना केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, जुन्या मोंढ्यात असलेले अन्य दोन दुकानेही फोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.