‘ट्रॉमा केअर सेंटर’ डॉक्टरांअभावी बंद
By Admin | Updated: July 11, 2016 00:28 IST2016-07-10T23:49:36+5:302016-07-11T00:28:55+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड बीड-परळी राज्यस्त्यावर तेलगाव येथील ट्रॉमा केअर सेटर सुरू करा असे आदेश सहा महिन्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यादरम्यान दिले होते.

‘ट्रॉमा केअर सेंटर’ डॉक्टरांअभावी बंद
व्यंकटेश वैष्णव , बीड
बीड-परळी राज्यस्त्यावर तेलगाव येथील ट्रॉमा केअर सेटर सुरू करा असे आदेश सहा महिन्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यादरम्यान दिले होते. मात्र डॉक्टर व लागणारे साहित्य नसल्याचे कारण पुढे करत अद्यापही तेलगाव येथील ट्रॉमा केअर सेंटर बंद स्थितीत आहे. केवळ दोन परिचारीकांची त्याठिकाणी नियुक्ती केलेली आहे.
परळी- बीड या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपघात होतात. अपघातांमध्ये जखमींना तात्काळ उत्तम आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने तेलगाव या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर साठी ईमारत उभारून दोन वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. परिणामी अपघातातील रुग्णांच्या जीवाशी आरोग्य प्रशासन खेळ करत आहे.
जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे व पाठपुराव्या अभावी तेलगाव येथील सेंटरवर अद्याप पर्यंत थ्रीफेज वीज नाही. शिवाय अपघातात जखमी रुग्णांवर आॅपरेशन करताना आवश्यक असलेली सीआर मशीन देखील दोन वर्षात उपलब्ध झालेली नाही. तेलगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरळीत सुरू करा, अशा सूचना अनेकवेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या आहेत. असे असताना देखील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केला आहे.
मागील पाच वर्षांत बीड-परळी राज्यरस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या दृष्टीने राज्य आरोग्य विभागाने परळी व बीड या शहरांच्या मध्यभागी तेलगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले होते. परंतु अद्याप पर्यंत डॉक्टरांच्या जागा भरल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले.