मनरेगा कामांसाठी मजुरांचा रास्ता रोको

By Admin | Updated: April 24, 2015 00:36 IST2015-04-24T00:24:25+5:302015-04-24T00:36:28+5:30

बदनापूर : दाभाडी येथे मनरेगाच्या कामांसाठी मजुरांची मागणी असतानाही ही कामे ट्रॅक्टरने सुरू झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने

Stop the work of laborers for MNREGA work | मनरेगा कामांसाठी मजुरांचा रास्ता रोको

मनरेगा कामांसाठी मजुरांचा रास्ता रोको


बदनापूर : दाभाडी येथे मनरेगाच्या कामांसाठी मजुरांची मागणी असतानाही ही कामे ट्रॅक्टरने सुरू झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने गुरूवारी राजूर-औरंगाबाद मार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये वादही झाला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
लाल बावटाच्या वतीने यापूर्वी २१ एप्रिल रोजी तहसीलदारांना मनरेगाच्या कामांची मागणी करणारे निवेदन देण्यात आले होते. कामे अकुशलमार्फत न होता, ती कुशल पद्धतीने होत असल्याचेही त्यात नमूद केले होते.
दाभाडी येथील बांधबंदिस्ताचे काम मजुरांमार्फत होणे आवश्यक असताना ते ट्रॅक्टरने सुरू असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने लाल बावटाच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दाभाडी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. ज्या गावात मजुरांची संख्या अधिक आहे, त्या गावात यंत्रबंदी करा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन मागे घ्यावे, यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे आंदोलक व पोलिसांमध्ये काहीसा वाद झाला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आंदोलकांना ताब्यात घेतले.
याबाबत आंदोलकांच्या म्हणण्यानुसार रास्ता रोको सुरू झाल्यानंतर महसूल प्रशासनातील अधिकारी किंवा कर्मचारी निवेदन घेण्याासाठी तेथे आले नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी येथे येऊन निवेदन स्वीकारावे, हीच आमची मागणी होती. पोलिसांनी ही मागणी धुडकावली. त्यामुळे पोलिसांसमवेत वादावादी झाली. पोहेकॉ. रामदास शिलवंत यांच्या फिर्यादीवरुन मारोती खंदारे, भाऊसाहेब जैवाळ, बाबाराव पाटोळे, अनिल गायकवाड, शे. शहारुख शे.गफार आदीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार बालाजी क्षीरसागर म्हणाले की, कार्यालयाबाहेर जाऊन निवेदन स्वीकारणे बंधनकारक नाही. तरीही आमच्या कार्यालयातील मंडळ अधिकारी आंदोलनस्थळी गेले होते. ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या कामांबद्दल विचारणा केली असता, तहसीलदार क्षीरसागर म्हणाले, कुशल-अकुशलचे प्रमाण ६०:४० याप्रमाणे आहे. ते साध्य करण्यासाठी काही कामे यंत्राद्वारे करावी लागतात. मजुरांनी नमूना क्रमांक ४ नुसार कामाची मागणी केल्यास त्यांना अन्य ठिकाणची कामे देता येतील, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Stop the work of laborers for MNREGA work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.