नांदेडात पाण्याची नासाडी थांबेना
By Admin | Updated: March 4, 2016 23:28 IST2016-03-04T23:26:05+5:302016-03-04T23:28:46+5:30
नांदेड : विष्णूपुरी जलाशयातील साठा झपाट्याने कमी होत असून सध्या १४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ या पाण्यावरच पुढील पावसाळ्यापर्यंत नांदेड शहराची तहान भागणार आहे़

नांदेडात पाण्याची नासाडी थांबेना
नांदेड : विष्णूपुरी जलाशयातील साठा झपाट्याने कमी होत असून सध्या १४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ या पाण्यावरच पुढील पावसाळ्यापर्यंत नांदेड शहराची तहान भागणार आहे़ सबंध मराठवाडा पाणीटंचाईने होरपळून निघाला असताना नांदेडात मात्र पिण्याच्या पाण्याची मोठी नासाडी होत आहे़
तीन दिवस सुटणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक निश्चित नसल्यामुळे दोन, दोन तास नळाचे पाणी वाया जात आहे़ नळाचे पाणी नाल्यात सोडले जात असून रस्ते, अंगण, वाहने धुण्याचे प्रकार पाहण्यास मिळत आहे़ अनेक नळाला तोट्या नसल्यामुळे हे पाणी अक्षरक्ष: वाया जात आहे़ येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ यासाठी महापालिकेने पाणीबचतीचे कोणतेच धोरण अद्याप जाहीर केले नाही़ पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी प्रत्येक भागात मनपाची पथके पाहणी करणार असल्याची घोषणाही फोल ठरली आहे़ रस्त्यावर नळाचे पाणी टाकणे, नालीत पाणी सोडणे, प्राणी धुणे, वाहने धुणे, नळाला तोट्या नसणे आदी प्रकार वाढत आहेत़ अनेक नागरिकांच्या घरात बोअर व नळ असल्याने ते नळाच्या पाण्याचा उपयोग इतर कामासाठी करत आहेत़ तर दुसरीकडे ज्यांना नळाचा पाणी मिळत नाही, ते घोटभर पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत़ पाणीटंचाईचे संकट समोर असताना नागरिक पाणी बचतीचे गांभीर्य बाळगण्यास तयार नाहीत़ नागरिकांसोबतच महापालिकेकडूनही काही भागात अतिरिक्त पाणीपुरवठा होत असून काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे़ या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने पाणी सोडण्याच्या वेळेत पाणीगळती व नासाडी थांबविण्याची गरज आहे़
मराठवाड्यातील लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद हे जिल्हे पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत़ पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो गावातील नागरिकांनी स्थलांतर केले आहे़ तर मोठ्या शहरातील नागरिकही मिळेल त्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत़ एकीकडे अशी परिस्थिती असताना नांदेडात मात्र पाण्याचा अपव्यय होत आहे़ रात्रीच्या वेळेस पाणी सोडले जात आहे़ त्यामुळे नागरिक आपले पाणी भरल्यानंतर नळाचे पाणी नालीत सोडून देत आहेत़ काही नागरिक तीन दिवस साठवलेले पाणी नळ सुटल्यानंतर रस्त्यावर उलटून देत आहेत़ पुन्हा पाणी भरत आहेत़ पाण्याचे महत्व अद्याप नागरिकांना कळत नसल्यामुळे येणाऱ्या काळात पाणी टंचाईचे संकट गडद होणार आहे़
सध्या विष्णूपुरी जलाशयात १३़ ५४ दलघमी पाणी उपलब्ध असून पाणीपातळी ३४८़७५ मीटरवर आहे़ एकूण क्षमतेच्या १६़७५ टक्के पाणी जलाशयात आहे़ (प्रतिनिधी)