अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर थांबविणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:04 IST2021-07-22T04:04:37+5:302021-07-22T04:04:37+5:30
औरंगाबाद : कोरोना, नैसर्गिक मृत्यूमुळे स्मशानभूमीमध्ये मागील महिनाभरापासून अंत्यसंस्कारासाठी अक्षरश: रांगा लागत आहेत. त्यातच सरणही महागले आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा ...

अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर थांबविणार!
औरंगाबाद : कोरोना, नैसर्गिक मृत्यूमुळे स्मशानभूमीमध्ये मागील महिनाभरापासून अंत्यसंस्कारासाठी अक्षरश: रांगा लागत आहेत. त्यातच सरणही महागले आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर थांबवून लगद्यापासून तयार होणाऱ्या विटांचा (ब्रिक्वेट्स) वापर करण्याचा निर्णय मनपाने यापूर्वीच घेतला. विटा खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. चार वेळेस निविदा प्रसिद्ध केल्यानंतर एका कंपनीने निविदा भरली. कंपनीने सादर केलेल्या विटांची तपासणी पुणे येथे करण्यात येणार आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. महापालिकेने तीन दशकांपूर्वी शहरात विद्युत दाहिनीचा प्रयोग केला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे आजही शहरातील विविध स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी शंभर टक्के लाकडांचाच वापर करण्यात येतो. शहरातील चार प्रमुख स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविण्याचे काम सुरू झाले. झाडांची कत्तल करून लाकडे आणली जात असल्यामुळे पर्यावरण धोक्यात येत आहे. प्रदूषण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी लाकडांचा वापर थांबविण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था म्हणून लगद्यापासून तयार विटांचा वापर अंत्यसंस्कारासाठी करण्याचा निर्णय घेतला. शहरात १६ स्मशानभूमीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात असून, त्याकरिता लाकडांचा वापर होतो. कोरोनात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले होते. बाहेरच्या जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्यावर शहरातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले जात असल्याने लाकडांचा वापर वाढलेला आहे. लाकडांचा वापर पूर्णपणे थांबविण्यासाठी लगद्यापासून किंवा ऊस, सोयाबीन यापासून तयार होणाऱ्या विटांचा (ब्रिक्वेट्स) वापर केला जाणार आहे. त्याकरिता मनपाने निविदा काढली. चार वेळेस निविदा प्रसिद्ध केल्यानंतर एका कंपनीने प्रतिसाद दिला. कंपनीने सादर केलेल्या विटांचे सॅम्पल तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर निविदा उघडून वर्क ऑर्डर देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.