उद्योगनगरीत खासगी रुग्णालयाकडून होणारी लूट थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:03 IST2021-04-07T04:03:27+5:302021-04-07T04:03:27+5:30
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील खासगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात असल्याची ...

उद्योगनगरीत खासगी रुग्णालयाकडून होणारी लूट थांबवा
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील खासगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार पंचायत समिती दीपक बडे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बजाजनगर व सिडको वाळूजमहानगर परिसरातील १० ते १२ खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यात येतात. परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. शासकीय रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. मात्र खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याच्या नातेवाइकांच्या तक्रारी आहेत. अगोदर बेड व व्हेंटिलेटर शिल्लक नसल्याचे सांगून खासगी डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांना वेठीस धरतात. कसेतरी उपचारासाठी दाखल केल्यावर मनमानी खर्च उकळतात.
शासनाने ठरवुन दिलेल्या दराला येथे केराची टोपली दाखविली आहे. शासनाने निश्चित केलेले दर रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावावेत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रुग्णावर उपचार करावेत, रुग्ण भरती करण्यापूर्वीच आगाऊ रक्कम घेऊ नये, उपचाराच्या नावाखाली खासगी रुग्णालयाकडून होणारी लूट थांबविण्यात यावी आदी मागण्या रांजणगाव पंचायत समितीचे सदस्य दीपक बडे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आदींकडे निवेदनाद्वारे केली आहे.
---------------------------