जालना शहरातील अवजड वाहनांची वर्दळ थांबेना..!
By Admin | Updated: November 25, 2015 23:17 IST2015-11-25T23:06:04+5:302015-11-25T23:17:37+5:30
जालना : शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, मुख्य चौक तसेच रस्त्यांवर वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने शहरात अवजड वाहनांना दिलेल्या वेळेत बंदी घातली आहे

जालना शहरातील अवजड वाहनांची वर्दळ थांबेना..!
जालना : शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, मुख्य चौक तसेच रस्त्यांवर वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने शहरात अवजड वाहनांना दिलेल्या वेळेत बंदी घातली आहे. मात्र एसटी महामंडळासह सर्वच वाहनांनी आदेशाला केराची टोपली दाखवत वाहतूक कायम ठेवली आहे. परिणामी वाहतूक कोंडीसह पादचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे.
सकाळी आठ ते दुपारी एक व दुपारी चार ते रात्री साडेआठ या काळात शहरातील मार्गावरून अवजड वाहनांसोबतच अॅपेरिक्षा, काळीपिवळी जीपला शहरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रवाशांनाही त्या चौफुलीवरच सोडावे, असेही आवाहन पोलिस प्रशासनाने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळण्याऐवजी शहरातून खुलेआम अवजड वाहनांची वर्दळ तसेच अवैध प्रवासी वाहतूक सुरूच असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी कारवाईचा इशारा देऊनही वाहनचालक शिस्त मोडण्यास हातभार लावत आहेत. यात प्रामुख्याने बसस्थानक परिसर, सिंधी बाजार, भोकरदन नाका, औरंगाबाद चौफुली आदी भागातून काळीपिवळी जीप, अॅपे सोबतच ट्रक्स, एसटी महामंडळाच्या बसेसह अनेक वाहने बिनधास्त शहरातून फिरत आहेत.
परिणामी सिंधी बाजार, बसस्थानक, मामाचौक, चमन, सराफा, फुलबाजार, भोकरदन नाका परिसरात वाहतूक ठप्प होत आहे. दरम्यान, नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी दीक्षितकुमार गेडाम यांनी दिला आहे.
शहरातील मुख्य मार्ग तसेच चौकांत पार्किंगचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. काही वाहनचालक मनमानीपणे वाहने पार्क करुन मोकळे होतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. नगर पालिकेकडून शहरात पार्किंगची व्यवस्था नसली तरी नागरिकांनीही आपली वाहने व्यवस्थित पार्किंग केल्यास वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकते, असे वाहतूक शाखेने म्हटले आहे. बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.