..तर बससेवा बंद करणार!
By Admin | Updated: August 17, 2014 00:17 IST2014-08-17T00:17:55+5:302014-08-17T00:17:55+5:30
जाफराबाद : जाफराबाद, भोकरदन तालुक्यात प्रमुख मार्गावर जाफराबाद आगाराच्या बसेस सोडताना रस्ते नादुरुस्त असल्याच्या कारणामुळे बस आगाराचे

..तर बससेवा बंद करणार!
जाफराबाद : जाफराबाद, भोकरदन तालुक्यात प्रमुख मार्गावर जाफराबाद आगाराच्या बसेस सोडताना रस्ते नादुरुस्त असल्याच्या कारणामुळे बस आगाराचे आर्थिक नुकसानीबरेबरच वेळेत प्रवासी सेवा देण्यास अडचणी येत आहेत. या रस्त्यांची आणि धोकादायक पुलांची दुरुस्ती करावी, नसता बस आगार बसेस बंद करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे पत्र आगारप्रमुख एस. जी. मेहेत्रे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जाफराबाद व भोकरदनच्या उपविभागांना दिले आहे.
जाफराबाद तालुक्यातील चिखली-जाफराबाद राज्य महामार्ग, भारज, आढा, वरुड वळण रस्ता व पूल धोकादायक बनला आहे. शिवाजी चौक जाफराबाद पूर्णा नदी पात्रापर्यंत रस्त्याची अवस्था पाहून शहराचे नाक दाबले आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा ते लिहा, भोकरदन, तडेगाव, माहोरा, पिंपळगाव कड, बोरगाव, हिवराबळी, जाफराबाद हा रस्ता दयनीय अवस्थेत असून रस्त्याचे साईड पट्टे, मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता धोदायक बनला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवासी वाहतूक करीत असताना आपला जीव धोक्यात ठेवून प्रवासी सेवा देतात. परंतु यामुळे आगाराला बसेसच्या स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पाटे तुटणे यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी बस सेवा वेळेत पोहचत नसल्याने विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बस आगाराने सहाय्यक उपअभियंता यांना १८ व २१ जुलै रोजी दोन वेळेस पत्र व्यवहार केला आहे.
माहोरा, पिंपळगाव रस्त्याचे डांबरीकरनाचे काम निकृष्ट झाले असून रस्त्याच्या दोन्ही बाजू मुरुमाने न भरता मातीत भरुन दोन-दोन फुयाचे खड्डे तयार झाले आहेत. पिंपळगाव, भोरखेडा, वरुड येथून ६५ मुली शाळेत ये-जा करतात. अशा परिस्थितीत बस बंद झाल्यास यांची जबाबदारी महामंडळ घेणार नाही, असे दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
लोकप्रतिनिधी यांनी उद्घाटने व लोकार्पण सोहळ्यांची स्पर्धा लावली आहे. कोटीने विकास निधी खेचून आणून उद्याचे भविष्य म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत आहोत, त्यांचे कंबरडे तर या निमित्ताने आधिच मोडीस निघाले आहे. याचा विचार करण्याची वेळ पालक, विद्यार्थी यांची आहे. (वार्ताहर)