भावाच्या पोटात कत्ती खुपसून आरोपी ठाण्यात
By Admin | Updated: April 9, 2015 00:13 IST2015-04-09T00:01:48+5:302015-04-09T00:13:54+5:30
उदगीर : उदगीर शहरात बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमाराला थरार घडला़ बालेखाँ पठाण यांने शेतीच्या वादातून आपल्या चुलत भावाच्या पोटात कत्ती खुपसून प्राणघातक हल्ला केला़ हल्ल्यानंतर

भावाच्या पोटात कत्ती खुपसून आरोपी ठाण्यात
उदगीर : उदगीर शहरात बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमाराला थरार घडला़ बालेखाँ पठाण यांने शेतीच्या वादातून आपल्या चुलत भावाच्या पोटात कत्ती खुपसून प्राणघातक हल्ला केला़ हल्ल्यानंतर स्वत: उदगीर शहर पोलिस ठाण्यात रक्तरंजीत हत्यारांसह हजर झाला आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उदगीर तालुक्यातील दावणगाव येथील आरोपी बालेखाँ बशीरखाँ पठाण हा सध्या उदगीर येथीेल रेल्वेस्टेशन भागात चहाची टपरी चालवितो. त्याचा चुलत भाऊ युसुफ अहेमद पठाण हा उदगीरमध्येच गॅरेजचा व्यवसाय करतो. या दोघांमध्ये गावाकडील शेतीवरून वाद सुरू होता. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शहरातील जुन्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोरील रस्त्यावर त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
या वादात आरोपी बालेखाँ पठाण याने हातातील कत्तीने युसुफ पठाण यांच्यावर वार केला. या घटनेत युसुफ पठाण गंभीर जखमी झाले असून, तेथून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना उदगीरच्याच लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून, नातेवाईक चिंतेत आहेत़ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या वादात प्राणघातक हल्ल्याचे टोक गाठल्याने नातेवाईक हादरले आहेत़ घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणीही केली़ दरम्यान, आरोपी बालेखाँ पठाण हा उदगीर शहर पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाला आहे. त्याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पोनि. परांडे यांनी सांगितले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ (प्रतिनिधी)