सोयगावात भरदिवसा दोन ठिकाणी चोऱ्या
By Admin | Updated: July 26, 2014 01:10 IST2014-07-26T00:55:33+5:302014-07-26T01:10:57+5:30
सोयगाव : शहरात शुक्रवारी दयाळनगर व आमराई (शिवाजीनगर) भागात दिवसाढवळ्या दोन ठिकाणी घराचे कुलूप तोडून चोऱ्या झाल्या.

सोयगावात भरदिवसा दोन ठिकाणी चोऱ्या
सोयगाव : शहरात शुक्रवारी दयाळनगर व आमराई (शिवाजीनगर) भागात दिवसाढवळ्या दोन ठिकाणी घराचे कुलूप तोडून चोऱ्या झाल्या. यात दोन लाख १५ हजारांचा ऐवज चोरी झाला आहे. भरदुपारी घडलेल्या घटनांमुळे सोयगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.
सोयगाव येथील दयाळनगर भागातील प्रकाश नथ्थू राऊत हे आपल्या कुटुंबासह शेतात गेलेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सहा हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा पंधरा हजाराचा ऐवज लंपास केला, तर दुसऱ्या एका घटनेत आमराई (शिवाजीनगर) भागात रामदास पवार यांच्या घराचे कुलूप तोडून पंधरा रुपये रोख व गोदरेज कपाटात ठेवलेले चाळीस ग्रॅम सोने व चाळीस भार चांदी असा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला.
या प्रकरणी प्रकाश राऊत व रामदास पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी चोरांचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केलेली आहेत.
शहर परिसरातील संशयित भागात पोलिसांची झाडाझडती सुरू झाली आहे. गस्त वाढविण्यात आलेली आहे. पो. नि. संतोष घाटेकर, दिलीप पवार, संतोष जिथोले, मनोज कुलकर्णी, सिद्धार्थ कांबळे, ए. एम. माळी, श्रीमती भांबळ, कुलते, सीताराम धनवट आदी पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, दुपारी बारा ते तीन या वेळे झालेल्या चोऱ्यांमुळे परिसरात खळबळ उडाली असून घराला कुलूप लावून शेतात जाणाऱ्या शेतकरी कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. (वार्ताहर)