म्युकरमायकोसिसला ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या पाण्याचीही उत्तेजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:04 IST2021-05-19T04:04:16+5:302021-05-19T04:04:16+5:30

औरंगाबाद : कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स देण्यात येत आहेत. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा मोठ्‌या ...

Stimulation of oxygen, ventilator water also to mucormycosis | म्युकरमायकोसिसला ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या पाण्याचीही उत्तेजना

म्युकरमायकोसिसला ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या पाण्याचीही उत्तेजना

औरंगाबाद : कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स देण्यात येत आहेत. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा मोठ्‌या प्रमाणात वापर होत आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या बाटल्यांमध्ये डिस्टिल वॉटरऐवजी साधे पाणी वापरले जात असल्यामुळे रुग्णांना म्युकरमायकोसिसचा (काळी बुरशी) धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णालयांनी तातडीने व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या बाटल्या स्वच्छ करून त्यामध्ये डिस्टिल वॉटर वापरावे, असे पत्र महापालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांना पाठवले आहे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

शहरात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून कोरोना होऊन गेलेल्यांना फंगल इन्फेक्शन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णांना नाकापासून (सायनासिस) फंगल इन्फेक्शनला सुरुवात होते. पुढे डोळे, जबडा आणि मेंदूमध्ये त्याचा फैलाव होतो. शहरात म्युकरमायकोसिसचे २०१ रुग्ण दाखल असून १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये स्टेरॉईडचे १४८, तर ऑक्सिजनची कमतरता असलेले ११० रुग्ण आहेत.

म्युकरमायकोसिसचा आजार कशामुळे होऊ शकतो, याबद्दल आरोग्य विभागाने काढलेल्या निष्कर्षांमध्ये एक प्रमुख कारण म्हणजे, सरकारी आणि खासगी रुग्णालयांत कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या बाटलीमध्ये होणारा साध्या पाण्याचा वापर होय. साध्या पाण्यामुळे काळी बुरशी लवकर होते. त्यामुळे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या बाटल्यांमध्ये डिस्टिल वॉटरच वापरण्याची सक्त सूचना करण्यात आली आहे.

महापालिकेने मंगळवारी तातडीने पत्र काढून, शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांना पाठवले आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या बाटल्यांची दररोज स्वच्छता करावी, या बाटल्या गरम पाण्याने धुतल्या जाव्यात, बाटल्यांमध्ये साधे पाणी न टाकता डिस्टिल वॉटर वापरावे, बाटल्यांतील पाणी बदलण्यात आल्याची तारीख बाटल्यांवर टाकण्यात यावी, या सूचनाही पत्रात केल्या आहेत.

मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये दररोज स्वच्छता

व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा वापर करताना त्याच्या बाटल्यांमध्ये साधे पाणी वापरले जात असल्याने काळी बुरशी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मेल्ट्रॉन कोविड सेंटरमधील ऑक्सिजनच्या बाटल्या स्वच्छ करून त्यामध्ये डिस्टिल वॉटरचा वापर केला जात आहे. रुग्णालयांनी देखील व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या बाटल्यांमध्ये डिस्टिल वॉटरचा वापर करावा.

- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

Web Title: Stimulation of oxygen, ventilator water also to mucormycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.