तरीही टमरेलची सवय सुटेना..!
By Admin | Updated: June 3, 2017 00:41 IST2017-06-03T00:40:27+5:302017-06-03T00:41:19+5:30
जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर पाणंदमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.

तरीही टमरेलची सवय सुटेना..!
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर पाणंदमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. शहरात नागरिक ज्या भागात उघड्यावर असतात, अशी २५ ठिकाणे निष्कासित केल्याचे पालिका प्रशासन सांगत आहे. मात्र, निष्कासित केलेल्या बहुतांश ठिकाणांवर नागरिक आजही टमरेल घेऊन उघड्यावरच बसतात, हे लोकमतने शुक्रवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारे उघडकीस आणले.
राज्य शासनाने सर्वाधिक लक्ष केंद्रित केलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानात पालिकेचे कामकाज असमाधानकारक असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. जालना शहर पाणंदमुक्तीसाठी तेरा हजार २०० वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकाम पूर्ण करणे, आणि ज्या ठिकाणांवर नागरिक उघड्यावर बसतात, अशी ४५ ठिकाणे प्राधान्याने निष्कासित करण्याचे नियोजन पालिकेने गतवर्षी केले होते. यासाठी नगरविकास विभागाने पालिकेला मार्च २०१७ ची डेडलार्ईन दिली. त्यामुळे पालिकेने कन्हैयानगर, लालबाग, पॉवरलूम, हनुमान घाट, मंगळबाजार परिसर, राजमहल टॉकीज परिसर जुना जालन्यातील मोतीबाग, जिल्हा परिषद वसाहत परिसर इ. भागांतील उघड्यावरील ठिकाणे निष्कासित करण्यासाठी मोहीम हाती घेतली.
गुड मॉर्निंग पथक व पोलिसांच्या मदतीने उघड्यावर बसणाऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत शहर पाणंदमुक्त झाल्याचा ठरावही घेण्यात आला.
मात्र, लोकमतने शुक्रवारी पहाटे केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये पालिका प्रशासनाने निष्कासित केलेल्या अनेक ठिकाणांवर नागरिक टमरेल घेऊन उघड्यावरच बसतात, असे चित्र पाहायला मिळाले. कन्हैयानगर रस्ता, लालबाग, मंगळबाजार, राजमहल टॉकीज परिसर, नूतन वसाहत, रेवगाव रोड, नूतन वसाहत या भागात सकाळी अनेकांचे हातात टमरेल पाहायला मिळाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यापूर्वी पालिका प्रशासनाने शहरातील बहुतांश ठिकाणे पाणंदमुक्त केली खरी, परंतु त्या ठिकाणांवर नागरिक पुन्हा उघड्यावर बसू नये यासाठी प्रभावी उपाय योजना न केल्यामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले.