तेलघणाच्या शाळेला अद्यापही कुलूपच; विद्यार्थ्यांचे नुकसान
By Admin | Updated: July 1, 2014 01:01 IST2014-07-01T00:05:59+5:302014-07-01T01:01:48+5:30
घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरपासून जवळच असलेल्या तेलघणा येथील जि.प. शाळेला अद्यापही कुलूपच आहे.

तेलघणाच्या शाळेला अद्यापही कुलूपच; विद्यार्थ्यांचे नुकसान
घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरपासून जवळच असलेल्या तेलघणा येथील जि.प. शाळेला अद्यापही कुलूपच आहे. शाळा सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी कुलूप न उघडल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या शाळेतील शिक्षकांच्या गलथान कारभाराबद्दल जि.प. अध्यक्षांनी शाळा उघडण्यासंदर्भात पत्र पाठविले होते. मात्र या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
तेलघणा येथील जि.प. शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. या शाळेत दोन शिक्षिका नियुक्त आहेत. तब्बल तीन वर्षांपासून एस.एस. चव्हाण या शिक्षिका चारही वर्गाचे काम पाहतात. तर दुसरी नियुक्त शिक्षिका चंद्रकला भारती या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर आहेत. तहसीलदार अंबाजोगाई यांनी ९ जून रोजी भारती यांना कार्यमुक्त केले. १० जून रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने भारती यांना पत्र देऊन तेलघणा जि.प. शाळेवर रुजू होण्याचे आदेश दिले. रुजू होण्याचे आदेश देऊनही व शाळा सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी भारती यांनी अद्याप शाळेचे तोंडच पाहिलेले नाही. याबाबत सरपंच शिवाजी सिरसाट, बाबासाहेब सिरसाट व पालकांनी जि.प. अध्यक्ष व शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन जि.प.मध्ये शाळा भरविण्याचा इशारा दिला होता. याबाबत जि.प. अध्यक्षांनी शिक्षण विभागाला भारती यांना निलंबित करण्याचे पत्र पाठविले होते व शाळा भरविण्याचे आदेश दिले होते. मात्र शिक्षण विभागाने जि.प. अध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शाळा कधी सुरू होणार? असा प्रश्न चिमुकल्या विद्यार्थ्यांना पडला आहे. (वार्ताहर)