पंचायत समित्यांचे कारभारी आज ठरणार
By Admin | Updated: September 14, 2014 00:21 IST2014-09-14T00:16:35+5:302014-09-14T00:21:15+5:30
औरंगाबाद : अडीच वर्षांचे आरक्षण संपुष्टात आल्याने रविवारी (दि.१४) जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी निवडणूक होणार आहे

पंचायत समित्यांचे कारभारी आज ठरणार
औरंगाबाद : अडीच वर्षांचे आरक्षण संपुष्टात आल्याने रविवारी (दि.१४) जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी निवडणूक होणार आहे. सध्या जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांपैकी ६ काँग्रेस आघाडीच्या ताब्यात असून २ शिवसेनेकडे, तर एक अपक्षाच्या ताब्यात आहे. उद्याच्या निवडणुकीत उलटफेर होणार काय, अशी चर्चा शनिवारी दिवसभर रंगली होती.
औरंगाबाद पंचायत समिती
औरंगाबाद पंचायत समितीत सध्या काँग्रेसच्या सरसाबाई वाघ सभापती आहेत, तर सर्जेराव चव्हाण हे उपसभापती आहेत. १८ सदस्यीय सभागृहात काँग्रेसचे ५ व राष्ट्रवादीचे २ सदस्य आहेत. दोन अपक्ष व मनसेच्या एका सदस्याच्या पाठिंब्याने गेल्या वेळेस काँग्रेसने हे सभापतीपद पटकावले होते. नुकत्याच जाहीर झालेल्या सातारा- देवळाई नगर परिषदेमुळे काँग्रेसच्या ताब्यात असलेला सातारा गण बरखास्त करण्यात आला. अन्यथा या सभागृहात काँग्रेसचे बळ ६ होते. काँग्रेसचे बळ घटल्यामुळे या वेळेस सभापतीपद खेचून घेण्यासाठी शिवसेना सक्रिय झाली आहे.
शिवसेनेचे या सभागृहात ४, भाजपा ३ असे युतीचे संख्या बळ ७ आहे. दोन अपक्षांना गळास लावण्याचा प्रयत्न सेनेने चालविला आहे. शिवसेना- भाजपाचे सदस्य गेल्या तीन दिवसांपासून भंडारदरा येथे सहलीवर गेले आहेत. आज रात्री हे सदस्य शहरात परतणार आहेत. शिवसेनेने गणेश नवले यांना सभापतीपदाचा, तर भाजपाने बळीराम गावंडे यांना उपसभापतीपदाचा उमेदवार ठरविले आहे.
काँग्रेसचे सदस्यही गेल्या तीन दिवसांपासून नाशिक, पुणे येथे मुक्कामास होते. ते उद्या पहाटे शहरात दाखल होणार आहेत. काँग्रेसने अद्याप सभापतीपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. दोन अपक्ष नेमकी काय भूमिका घेतात, यावरच औरंगाबाद पंचायत समितीचा कारभारी ठरणार आहे.