पिंपळ्याच्या कदम कुटुंबाची फरफट सुरुच

By Admin | Updated: January 8, 2015 00:57 IST2015-01-08T00:48:56+5:302015-01-08T00:57:13+5:30

तामलवाडी : शेतात नव्याने घेतलेला बोअर आठ दिवसात गाळाने बुजला.

The steps of Pipalwas are going on smoothly | पिंपळ्याच्या कदम कुटुंबाची फरफट सुरुच

पिंपळ्याच्या कदम कुटुंबाची फरफट सुरुच



तामलवाडी : शेतात नव्याने घेतलेला बोअर आठ दिवसात गाळाने बुजला. यासाठी अडीच लाखाचे घेतलेले कर्ज कशाने फेडायचे. या चिंतेने नानासाहेब गेनदेव कदम (रा. पिंपळा खु.) यांनी २४ एप्रिल २०१४ रोजी गळफास लावून आत्महत्या केली. अचानक पती गेल्याने विमलला धक्का बसला. कसेबसे सावरत दोन मुलांसाठी जगावं लागणार हे समजून १० महिन्यापासून दु:ख आवरत अडचणींवर मात करीत कदम कुटुंब जीवन जगत आहे. शासनाकडून अद्यापही दमडीचीही मदत मिळालेली नाही.
शेतकरी नानासाहेब कदम यांच्या पश्चात २ मुले, पत्नी असा परिवार आहे. तीन एकर माळरान, खडकाळ जमीन त्याच जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. नानासाहेब खाजगी कारखान्यात हंगामी कामावर जात. शेती बागायती व्हावी म्हणून त्यांनी एकत्रीत कुटुंबात असतानाच बोअर घेतला. त्यासाठी तामलवाडी येथील महाराष्ट्र बँकेकडून साडेतीन लाखाचे कर्ज घेतले. बोअर खोदाईही केली, पाणी लागले. मोटार बसविण्यासाठी आठ दिवस लागले तोवर संपूर्ण बोअर गाळाने बुजला. नंतर मोटार बाहेर काढून बोअर फुरळणी केली व मोटार सोडली. थोडे दिवस पाणी मिळाले. पुन्हा गाळात मोटार अडकून तुटून निघाली. त्यात बोअरचे पाणी गायब झाले. पाण्यासाठी अडीच लाख झालेला खर्च वाया गेला. कर्जाचा बोजा कसा फेडणार या विवंचनेत नानाहेब कदम होते. अखेर घरात कुणी नाही याची खातरजमा करुन त्यांनी २४ एप्रिल २०१४ रोजी दुपारच्या सुमारास गळफास घेवून स्वत:ला संपविले. मात्र त्यांच्या पश्चात कुटूंबावर संकटांचा डोंगर कायम आहे. नानासाहेब गेल्यामुळे पत्नी विमल हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. सासू, सासरेही मयत आहेत. दिराचा आधार घेत पोटच्या दोन मुलांना बळ देत विमलने स्वत:ला सावरत १० महिने काढले.
महसूल व पोलिस पंचनाम्याचा प्रस्ताव महसूल प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. परंतु दाखल केलेल्या प्रस्तावास अधिकाऱ्यांनी त्रुटी काढून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रस्ताव फेटाळला. नानासाहेब कदम यांच्यावर कर्ज होते हे स्पष्ट असताना त्याने कर्जापायी आत्महत्या केली की नाही हे महसूल प्रशासनाला कळले नाही. १० महिन्यांपासून कदम कुटुंबिय मदतीपासून वंचित आहे. अशावेळी मुलांनी विमलला आधार दिला. राहूल वय (२६) हा सध्या पुण्यामध्ये कंपनीत कामाला आहे. तर लखन (वय २१) हा शेती सांभाळत आहे. यंदा तीन एकर माळरान जमिनीत विमल हिने कांदा लागवड केली. ४०० ते ४५० पिशव्या कांदे निघाऱ्या शेतात अवघे १५० पिशव्या कांदा निघाला. त्यातील अर्धे कांदे अवकाळी पावसात शेतातच भिजून नासून गेले. त्यामुळे यावर्षी नुकसानीला सामोरे जावे लागले.
विहिरीचा पाणीसाठाही कमी झाला असून, बोअरही आटले. ज्वारीची ताटे जमिनीलगत आहेत. उत्पादन काय निघणार? यावर विमलबार्ईंचा गाडा कसा चालणार असा प्रश्न आहे. मात्र विमलबार्इंनी या संकटातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा कष्ट सुरु केले आहेत. शेतकऱ्यांनी संकटसमयी डगमगून न जाता संकटाचा धिराने सामना करावा. आपल्या पश्चात कुटूंबावर काय वेळ येईल याचाही विचार करायला हवा असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)४
वडिलांनी कोरडवाहू जमीन किमान हंगामी बागायत व्हावी, यासाठी अडीच लाख खर्च केला. साडेतीन लाखाचे कर्ज झाले. त्यामुळे आत्महत्या केली. आम्हावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातूनही जगण्याची जिद्द कायम ठेवली. आत्महत्या कर्जासाठी पर्याय नाही. संकटाचा निपटारा करत शेतकऱ्यांनी जगावे, असे आवाहन लखन कदम यांनी केले आहे.

Web Title: The steps of Pipalwas are going on smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.