आजीच्या घरी नातवाकडून लातुरात चोरी
By Admin | Updated: February 5, 2017 23:18 IST2017-02-05T23:11:22+5:302017-02-05T23:18:17+5:30
लातूर : आजीच्या घरी नातवाने चोरी करून १८ तोळे सोन्याचे दागिने पळविले.

आजीच्या घरी नातवाकडून लातुरात चोरी
लातूर : औसा रोडवरील इंजिनिअरिंग कॉलनीतील एका आजीच्या घरी नातवाने चोरी करून १८ तोळे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना १८ आॅक्टोबर २०१६ रोजी घडली होती. या प्रकरणातील आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छडा लावला असून, एका सज्ञान आरोपीसह अन्य दोघा अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकाला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर अन्य दोघांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा छडा फेसबुकवरील मेसेजवरून लागला.
औसा रोडवरील इंजिनिअरिंग कॉलनी परिसरात राहणाऱ्या भिवाजी एकनाथराव कावळे यांच्या घरातून तब्बल १८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना आॅक्टोबर २०१६ मध्ये घडली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भिवाजी कावळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर दीपक दत्तात्रेय औताडे याच्यावर संशय आल्यामुळे पोलीस व नातेवाईकांनी लक्ष ठेवले. दरम्यान, तो करीत असलेल्या खर्चाच्या रकमेवरून पोलिसांचा संशय अधिक बळावला. दीपक आणि त्याच्या अन्य दोन मित्रांनी हे दागिने एका सराफाकडे विक्री केल्याचे पुढे आले. त्यातून हाती आलेल्या पैशातून त्याने ठिकठिकाणी भटकंती केली.
दरम्यान, गोवा येथे गेल्यानंतर तेथे काढलेले सेल्फी फोटो त्याने आपल्या फेसबुकच्या अकाऊंटवर एकमेकांना शेअर केले. पोलिसांनी नातवाचे फेसबुक अकाऊंट चेक केले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याने आजीच्या घरातील सोने चोरल्याचे कबूल केले. त्यातूनच आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो असल्याचे म्हटले आहे. अन्य दोघा अल्पवयीन मित्रांचीही नावे दीपकने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी दीपक औताडेला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अन्य दोघा अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.