कार्यालयात थांबा; अन्यथा वेतन कपात!
By Admin | Updated: November 4, 2014 01:38 IST2014-11-04T00:36:42+5:302014-11-04T01:38:46+5:30
बीड : कोणाचीही कामे अडवू नका़, बेकायदेशीर कामांना थारा देऊ नका़, शिस्त पाळा अन्यथा वेतन कपात करु, असा इशारा देत जि़प़ अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी विभाग प्रमुखांच्या

कार्यालयात थांबा; अन्यथा वेतन कपात!
बीड : कोणाचीही कामे अडवू नका़, बेकायदेशीर कामांना थारा देऊ नका़, शिस्त पाळा अन्यथा वेतन कपात करु, असा इशारा देत जि़प़ अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी विभाग प्रमुखांच्या पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांना घाम फोडला़ सोमवार व शुक्रवारी मुख्यालय सोडू नका, अशी सूचना देत त्यांनी दांडीबहाद्दरांनाही दम भरला़ सोमवारी नव्या कारभाऱ्यांनी दिवसभर बैठका घेत आढावा घेतला़ त्यामुळे अधिकारी घामाघूम झाले़
जि़प़ अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी आपल्या दालनात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली़ यावेळी विविध विभागांचा आढावा घेतला़ सोमवार व शुक्रवार या दोन वारी एकही अधिकारी मुख्यालय सोडणार नाही़ दौऱ्यावर जाताना दालनाबाहेर कोठे जाणार आहात? याची नोंद ठेवावी़ सर्वांनी भ्रमणध्वनी सुरु ठेवावेत़ आऊअ आॅफ रेंज राहून लोकांची कामे खोळंबू नयेत, याची काळजी घ्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या़ शिवाय यासंदर्भातील माहिती अध्यक्षांच्या दालनातही कळविणे बंधनकारक केले आहे़ बैठकीसाठी प्रतिनिधी न पाठवता स्वत: विभागप्रमुखांनीच हजर रहावे, असे फर्मानही त्यांनी सोडले़ पाणीटंचाई भेडसावण्यास सुरुवात झाली आहे़ हातपंप दुरुस्तीची कामे वेगात सुरु करुन विहीर अधिग्रहण व टँकर सुरु करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करण्यासही त्यांनी सांगितले़
पदाधिकाऱ्यांनी घेतल्या बैठका
सोमवारी विविध पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन आढावा घेतला़ अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासोबतच उपाध्यक्षा आशा संजय दौंड यांनीही आपल्या दालनात कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ सभागृहात आरोग्य व शिक्षण सभापती बजरंग सोनवणे यांनी अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली़ यावेळी त्यांनी प्रलंबित कामे, चौकशांची स्थिती याबाबतचा आढावा घेतला़ सुधारणा करण्याच्या दृष्टीने त्यांनी सूचनाही दिल्या़ या बैठकीला अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनीही हजेरी लावली़ समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे यांनी आपल्या दालनात बैठक घेऊन आढावा घेतला़
‘सरप्राईज’ भेटी
साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू आहेत़ आठवड्यातून एक दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रांना सरप्राईज भेट देणार आहे़ आरोग्य सेवा सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न आहेत, असे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सांगितले़
मालमत्तेची देखभाल
जिल्हा परिषदेच्या ताब्यातील मालमत्तेची देखभाल व दुरूस्ती करण्यात येणार आहे़ भूखंडावरील अतिक्रमणे हटवून न्यायालयीन प्रकरणाचा आढावा घेणार असल्याचे पंडित म्हणाले़ त्यासाठी सर्व गट विकास अधिकारी, पंचायत विभाग, सामान्य प्रशासन विभाग, जि़ प़ च्या पॅनलवरील वकील यांची लवकरच बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले़ (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेची अद्ययावत इमारत उभारण्यात येणार आहे़ त्याचे काम लवकरच सुरु केले जाणार आहे़ शासनाकडून ३६ कोटी इतका निधी मंजूर झाला आहे़ पैकी १८ कोटी रुपये आले आहेत़ शिवाय जि़प़ च्या भूखंड हस्तांतरपोटी आलेले ४ कोटी ५३ लाख रुपये देखील बांधकामासाठी वापरण्यात येणार आहेत़ बांधकामाचा आठ दिवसाला आढावा घेतला जाईल़ काम दर्जेदार व पारदर्शक होणार असल्याचेही अध्यक्ष पंडित म्हणाले़
बैठकीसाठी सीईओ राजीव जवळेकर, कॅफो वसंत जाधवर यांनी दांडी मारली़ त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सांगितले़