थेट आयुक्तांनीच लावला वर्षभरानंतर खुनाचा छडा

By Admin | Updated: June 29, 2016 01:01 IST2016-06-29T00:28:24+5:302016-06-29T01:01:29+5:30

औरंगाबाद : गतवर्षी मे महिन्यात भांगसी माता गडाच्या पायथ्याशी संध्या सखी (३५) या तृतीयपंथीचा निर्घृण खून झाला होता.

The statue of the deceased is taken directly by the Commissioner | थेट आयुक्तांनीच लावला वर्षभरानंतर खुनाचा छडा

थेट आयुक्तांनीच लावला वर्षभरानंतर खुनाचा छडा



औरंगाबाद : गतवर्षी मे महिन्यात भांगसी माता गडाच्या पायथ्याशी संध्या सखी (३५) या तृतीयपंथीचा निर्घृण खून झाला होता. वाळूज एमआयडीसी ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अनेक खबरे कामाला लावले, अनेक प्रयत्न केले; परंतु खुनाचे काही धागेदोरे हाती लागले नाही. त्यामुळे हे प्रकरण थंडबस्त्यात पडलेले असताना तब्बल एक वर्षानंतर थेट पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीच या गुन्ह्याचा छडा लावला. आयुक्तांच्या स्वत:च्या खबऱ्याने खबर दिली अन् या खुनाचे गूढ उकलले...
‘पैसे दिल्याशिवाय अंगाला हात लावू नका,’ असे म्हटल्यामुळेच दारूच्या नशेत असलेल्या दोन तरुणांनी या तृतीयपंथीचा निर्घृण खून केला होता, असे तपासात समोर आले. खून करणारे रामकृष्ण ऊर्फ पिंट्या अश्वथामा त्रिपाठी (३५, रा. वडगाव कोल्हाटी) आणि एकनाथ शिवाजी आहेर (२६, रा जयभवानी चौक, बजाजनगर) या दोन्ही आरोपींना गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, २२ मे २०१५ रोजी भांगसी माता गडाच्या पायथ्याशी संध्या या तृतीयपंथीचे प्रेत आढळून आले होते. त्याचा अत्यंत निर्घृण खून करण्यात आलेला होता. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पोलिसांनी आपले खबरे कामाला लावले. विविध अंगांनी या गुन्ह्याचा तपास केला; परंतु काहीही हाती लागले नाही. शेवटी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी हतबल होऊन तपास थंडबस्त्यात टाकून दिला होता.
आयुक्तांनाच मिळाली ‘खबर’
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीत औरंगाबादेत आपले स्वत:च्या खबऱ्यांचे एक वेगळे ‘नेटवर्क’ उभारलेले आहे.
आयुक्तांचे हेच नेटवर्क संध्याच्या खुनाचे गूढ उकलण्यासाठी कामी आले. आयुक्तांच्या एका खबऱ्याने चार दिवसांपूर्वी थेट आयुक्तांनाच संपर्क साधून संध्याच्या खुनामागे वडगाव कोल्हाटी परिसरातील रामकृष्ण त्रिपाठी ऊर्फ पिंट्याचा हात आहे, अशी खबर दिली.
लागलीच आयुक्तांनी गुन्हे शाखेला कामाला लावले. लगेच गुन्हे शाखा पोलिसांनी शोध घेऊन चार दिवसांंपूर्वी पिंट्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली; परंतु त्याने काही तोंड उघडले नाही.
आपल्याला काही माहीत नाही, असेच तो सांगत होता. शेवटी चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले. मात्र, हाच आरोपी आहे, याची आयुक्त आणि गुन्हे शाखेला खात्री होती. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली.
पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर पिंट्या त्रिपाठी दारूच्या अड्ड्यावर गेला. साथीदारांसोबत त्याने मनसोक्त दारू ढोसली आणि नशेत बोलता बोलता ‘मी तर पोलिसांना वेड्यात काढून आलो’ असे तो बोलून गेला. ही बाब पाळतीवर असलेल्या खबऱ्याने लगेच पोलिसांना सांगितली.
काल अखेर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, निरीक्षक मधुकर सावंत, फौजदार बागूल, जमादार नितीन मोरे, विलास वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिंट्याला उचलले. ‘त्याला’ खाक्या दाखवून विचारपूस सुरू करताच अखेर त्याने तोंड उघडले. साथीदार एकनाथ आहेर याच्या मदतीने तृतीयपंथी संध्याचा खून केल्याची त्याचे स्पष्ट कबुली दिली. लगेच त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी एकनाथलाही अटक केली.
आरोपी पिंट्या आणि एकनाथ हे खाजगी कंपनीत नोकरी करतात. दोघे चांगले मित्र आहेत. सोबत सतत ते दारू पितात. ‘त्या’ दिवशी दोघांनी दारू ढोसली होती. घरी जात असताना त्यांना कोलगेट कंपनीसमोर तृतीयपंथी संध्या नजरेस पडला. मग त्यांनी संध्यासोबत अनैसर्गिक संबंधाची बोलणी केली. नंतर त्याला घेऊन ते भांगसी माता गडाच्या पायथ्याशी आले. तेथे ‘आधी पैसे द्या, त्याशिवाय अंगाला हात लावू देणार नाही’ असे तृतीयपंथी म्हणाला. या दोघांकडे पैसे नव्हते. पैशाशिवाय तो हात लावू देईना. त्यातून त्यांच्यात वाद झाला आणि मग रागाच्या भरात नशेत असलेला पिंट्या आणि एकनाथने या तृतीयपंथीचा खून केला, असे तपासात समोर आल्याचे पोलीस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.

Web Title: The statue of the deceased is taken directly by the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.