छत्रपती संभाजीनगर : संसार करताना ती ‘अर्धांगिनी’ असते. मात्र, पतीच्या निधनानंतर ती एकटीच कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. त्यामुळे तिला ‘विधवा’ न म्हणता ‘पुर्णांगिनी’ म्हणून तिचा सन्मान करावा, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गुरुवारी केले. संबोधनातील हा बदल करण्यासंदर्भात राज्य महिला आयोगाने शासनाला शिफारसही केली आहे, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने जिल्ह्यात ‘महिला सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येत आहे. त्या अभियानांतर्गत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ‘महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जि. प. सीईओ विकास मीना, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, संगीता राठोड, नीलम बाफना, महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांची उपस्थिती होती.
आयोगांनी केली आहे शिफारसमहिलांनी स्वतःला आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. उगाचच उपवास करू नयेत. प्रशासकीय यंत्रणेतील महिलांनी समाजातील घटक म्हणून पदावर काम करताना सोबतच्या महिलांना जागरूक करावे. समाजात आजही विधवा महिलांना अवहेलना सहन करावी लागते. वास्तविक विधवा महिला या कुटुंबात आई-वडील या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यामुळे त्यांना अधिक सन्मान दिला पाहिजे. राज्य महिला आयोगाने विधवा हा शब्द हटवून त्या ऐवजी ‘पुर्णांगिनी’ हा शब्द वापरावा अशी शिफारस शासनाला केली आहे.- रूपाली चाकणकर, राज्य महिला आयोग अध्यक्ष