राजकीय हालचाली वेगवान; इच्छुक वारीवर

By Admin | Updated: September 17, 2014 00:20 IST2014-09-17T00:19:50+5:302014-09-17T00:20:36+5:30

हिंगोली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाचा आतापर्यंत मागमूसही नव्हता.

State movements fast; Interested walker | राजकीय हालचाली वेगवान; इच्छुक वारीवर

राजकीय हालचाली वेगवान; इच्छुक वारीवर

हिंगोली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाचा आतापर्यंत मागमूसही नव्हता. आता मात्र हालचाली गतिमान होत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यामुळे उमेदवारीची चिंता लागलेल्यांना पुन्हा पक्षश्रेष्ठींची आठवण झाली असून इच्छुकांच्या दिल्ली, मुंबई वाऱ्या सुरू झाल्या आहेत.
यावेळी कधी नव्हे, एवढी परिस्थिती बिकट बनली आहे. दोन जण वगळता इतर कुणालाही प्रमुख पक्षाची उमेदवारी नक्की आपल्यालाच मिळेल, याची शाश्वती नाही. सर्वच ठिकाणी उमेदवारीचे चित्र स्पष्ट नसल्याने कार्यकर्त्यांची उत्कंठा ताणली जात आहे. त्यातच वावड्या उठविण्यात वाकबगार असलेला गटही सक्रिय आहे. सर्व पक्ष वेगवेगळे लढणार आहेत, त्यामुळे कोणाची उमेदवारी अंतिम व कोणाचा पत्ता कापला गेला, हे सांगून मनोरंजन केले जात आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात एकीकडे कॉंग्रेसच्या इच्छुकांत एका नावावर एकमत नसल्याने तो राष्ट्रवादीला सुटणार असल्याच्या वावड्या उठत असतानाच सेनाही तो रासपला सोडणार असल्याची बातमी धडकली. त्यामुळे या मतदारसंघात तर सगळ्यांच्याच जिवाला घोर लागून आहे. कॉंग्रेसकडून अजूनही दिलीपराव देसाई, डॉ. संतोष टारफे, बाबा नाईक, जकी कुरेशी, अजित मगर यांची नावे चर्चेत असून भागोराव राठोडही प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेकडून येथे माजी आ.गजानन घुगे यांची उमेदवारी पक्की वाटत असताना अगोदर जिल्हाप्रमुख संतोष बांगर, गोविंदराव गुठ्ठे, डॉ.वसंतराव देशमुख ही मंडळी प्रयत्नशील होती. आता नव्याने डॉ.रमेश मस्के यांच्या नावाची भर पडली. त्यांची ‘मातोश्री’ भेटही चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादीचे शिवाजीराव माने, डॉ. जयदीप देशमुख, कृष्णराव भिसे यांच्याही श्रेष्ठींकडे वाऱ्या सुरूच आहेत. माने यांचे नाव कधी-कधी सेना व रासपकडूनही चर्चेत येते. त्यामुळे येथे अनिश्चितेने परिसीमा गाठली आहे.
वसमतमध्ये दोन जयप्रकाश अतिशय संथ गतीने चाली रचत आहेत. पुन्हा हाच दुरंगी सामना रंगणार असल्याचा त्यांचा होरा आहे. मात्र शिवाजी जाधव यांच्यामुळे एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस हैराण आहे तर दुसरीकडे शिवसेना. जाधव यांची तयारी सुरू असली तरी त्यांना शिवसेनेच्या उमेदवारीची आस आहे. मात्र शेवटच्या क्षणी जयप्रकाश दांडेगावकर व जयप्रकाश मुंदडा यांच्यातील दुरंगी लढतीला तिरंगी करण्याचे काम ते करतील, असेच सध्यातरी चित्र आहे. एक तुल्यबळ स्पर्धक दुर्लक्षून दोघांनाही चालणार नाही, हेही तेवढेच खरे.
हिंगोलीत आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्याशी लढायला कोण उमेदवार राहील, हे अजून निश्चित नाही. भाजपात तर अंतर्गत वाद एवढे वाढले की, जितके उमेदवार तितके वाद अशी स्थिती आहे. रोजच नवी कुरबूर इच्छुकांपैकी कोणीतरी पुढे आणतो. तानाजी मुटकुळे या प्रमुख दावेदारालाच काहींनी लक्ष्य बनविले आहे. बाबाराव बांगर, पंडितराव शिंदे, माणिकराव पाटील भिंगीकर, मिलिंद यंबल, मनोज जैन, पुंजाजी गाडे, अ‍ॅड. प्रभाकर भाकरे अशी रांग लागलेली आहे. त्यात माजी आ. बळीराम पाटील कोटकर यांनीही दंड थोपटले आहेत. आता सूर्यकांता पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर ही जागा त्यांच्या कोट्यात जाणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. त्यामुळे भाजपा इच्छुकांना ही एक नवी चिंता लागली आहे.
एवढे सगळे कमी म्हणून की काय वरिष्ठ पातळीवर जागा वाटपावरून ताणल्या गेलेल्या मुद्याचाही काहीजण फायदा उचलत आहेत. सर्वच पक्ष वेगळे लढणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी अमक्या पक्षाचा उमेदवार मीही असू शकतो, असे काहीजण छातीठोकपणे सांगत आहेत. नामनिर्देशनपत्राला ‘ए,बी’ फॉर्म लागेपर्यंत खरेच कोणाला उमेदवारी मिळाली, हे खरे पटणार नाही, अशी स्थिती आली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: State movements fast; Interested walker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.