राज्यस्तरीय पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ‘डायल ११२’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:03 IST2021-05-19T04:03:26+5:302021-05-19T04:03:26+5:30
वैद्यकीय आपत्कालीन सेवेसाठी १०८ क्रमांक डायल करून मदत मिळविता येते. अपघातग्रस्त जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी १०८ क्रमांक डायल केल्यावर तातडीने ...

राज्यस्तरीय पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ‘डायल ११२’
वैद्यकीय आपत्कालीन सेवेसाठी १०८ क्रमांक डायल करून मदत मिळविता येते. अपघातग्रस्त जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी १०८ क्रमांक डायल केल्यावर तातडीने रुग्णवाहिका डॉक्टरासह घटनास्थळी पोहोचते. प्राथमिक उपचार करून जखमी रुग्णाला अधिक उपचारांसाठी रुग्णालयात नेले जाते. डायल १०८ ही योजना यशस्वी झाल्यावर राज्य सरकारने डायल ११२ हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे राज्यस्तरीय कार्यालय ठाणे येथे आहे. तेथेच राज्यस्तरीय पोलीस नियंत्रण कक्ष असेल. या नियंत्रण कक्षाशी राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांसह सर्व पोलीस ठाणे आणि पोलिसांची वाहने जीपीएस यंत्रणेने जोडली जात आहेत. डायल ११२ प्रकल्पांतर्गत शहर पोलीस आयुक्तालयास १२ बोलेरो जीप खरेदी करण्यात आल्या. जिल्हा विकास योजनेंतर्गत मिळालेल्या निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या उपस्थितीत सोमवारी या वाहनांचे पूजन आणि लोकार्पण करण्यात आले. लवकरच या वाहनांची आरटीओकडे नोंदणी होईल. यानंतर डायल ११२ च्या सेवेत ती दाखल होतील.
=========
चौकट
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
शहर पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय पोलीस नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचे नुकतेच प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी दिली.
===============
दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद शहराचा समावेश
डायल ११२ हा प्रकल्प राज्यभरात तीन टप्प्यांत कार्यान्वित होईल. औरंगाबाद शहराचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीतील गस्तीवरील ९ पीसीआर कार, ३४ टू मोबाइल व्हॅन, ५ थ्री मोबाइल कार आणि दामिनी पथकाच्या २ कार, तसेच शहरातील १७ पोलीस ठाण्याचे फोन नंबर राज्यस्तरीय पोलीस नियंत्रण कक्षाला जोडले जातील.