राज्य जीएसटी विभागाकडून सात बोगस व्यापाऱ्यांचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:05 IST2021-01-16T04:05:42+5:302021-01-16T04:05:42+5:30

औरंगाबाद : शहरातील सात व्यापाऱ्यांनी बोगस फर्म नोंदणी करून त्याद्वारे खरेदी-विक्री न करता १०० कोटींपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके ...

State GST department exposes seven bogus traders | राज्य जीएसटी विभागाकडून सात बोगस व्यापाऱ्यांचा पर्दाफाश

राज्य जीएसटी विभागाकडून सात बोगस व्यापाऱ्यांचा पर्दाफाश

औरंगाबाद : शहरातील सात व्यापाऱ्यांनी बोगस फर्म नोंदणी करून त्याद्वारे खरेदी-विक्री न करता १०० कोटींपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके सादर करीत करचुकवेगिरी करीत शासनाला चुना लावला आहे. या बोगस व्यापाऱ्यांचा पर्दाफाश राज्य जीएसटी विभागाने केला. औरंगाबाद विभागातील अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईतून ही बाब उघडकीस आली. यानुसार असे लक्षात आले की, शहरातील इंद्र ट्रेडर्स, पूर्ती कन्स्ट्रक्शन आणि विधाता मेटल्स यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा २०१७ अन्वये नोंदणी करून जीएसटीआयएन क्रमांक प्राप्त केले आहेत. मात्र, ही नोंदणी करताना खोट्या कागदपत्रांचा वापर करून नोंदणी क्रमांक प्राप्त केल्याचे दिसून आले.

याच कारवाईदरम्यान आणखी चार बोगस कंपन्यांची माहिती विभागाला मिळाली. यात सृष्टी इम्पेक्स, विधी एंटरप्राईजेस, जय गणेश कॉर्पोरेशन, एम.के. एंटरप्राइजेस या कंपन्याही खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोंदणी दाखला घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.

विशेष म्हणजे हे सात व्यापारी कोणत्याही मालाची प्रत्यक्ष खरेदी-विक्री न करता मोठ्या प्रमाणात खोटी बिलं स्वीकारून व निर्गमित करत असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रात २५ व राज्याबाहेरील २००पेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी अशाच प्रकारच्या मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, तसेच खोटी कागदपत्रे वापरून नोंदणी दाखला घेतल्याचे सत्य समोर आले आहे. त्याद्वारे बोगस देयके निगर्मित केली असल्याची शक्यता राज्य जीएसटीच्या तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई विभागाचे राज्यकर सहआयुक्त आर.एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. राज्यकर उपायुक्त रवींद्र जोगदंड, सहायक राज्यकर आयुक्त मकरंद कंकाळ, माधव कुंभरवाड, धनंजय देशमुख, तुषार गावडे तसेच विभागातील १५ राज्यकर निरीक्षक तपासणी प्रक्रिया पार पाडत आहेत.

चौकट

१०० कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी दयके

सात बोगस व्यापाऱ्यांनी १०० कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके निर्गमित करून शासनाचा महसूल बुडवला आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्याअंतर्गत दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे.

चौकट..

शासनाला फसविणाऱ्या कंपन्या

इंद्र ट्रेडर्स, पूर्ती कन्स्ट्रक्शन, विधाता मेटल्स, सृष्टी इम्पेक्स, विधी एंटरप्राइजेस, जय गणेश कॉर्पोरेशन, एम. के. एंटरप्राइजेस

Web Title: State GST department exposes seven bogus traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.