चारा छावणीसाठी राज्य शासन उदासीन
By Admin | Updated: August 22, 2015 23:59 IST2015-08-22T23:46:07+5:302015-08-22T23:59:37+5:30
लातूर : मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या भेटी घेऊन लातूर जिल्ह्यातील दुष्काळासंदर्भात चर्चा केली असता, तुम्ही चारा छावण्या सुरु करा, तुम्हाला सर्वतोपरी मदत करु

चारा छावणीसाठी राज्य शासन उदासीन
लातूर : मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या भेटी घेऊन लातूर जिल्ह्यातील दुष्काळासंदर्भात चर्चा केली असता, तुम्ही चारा छावण्या सुरु करा, तुम्हाला सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन देण्यात आले होते़ लातुरात ३ आॅगस्ट रोजी चारा छावणी सुरु केली़ या चारा छावणीला अद्यापही मंजुरीही मिळाली नाही़ तसेच कसलीच आर्थिक मदतही करण्यात आली नाही़ पण केवळ वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्रांची पुर्तता करण्याच्या नावाखाली मानसिक त्रासच प्रशासनाकडून होत असून, चारा छावणीसाठी शासन उदासीन असल्याचा आरोप सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी पत्रपरिषदेत शनिवारी केला़
सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी एक लाखाचा निधी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती़ आजघडीला ४० शेतकऱ्यांचे २२७ पशुधन चारा छावणीत आहेत़ या पशुधनाला प्रतिदिन दहा किलो चारा देण्यात येतो़ याचा प्रतिदिन खर्च एका पशुधनास दीडशे रुपयाचा चारा लागतो़
२२७ पशुधनाला प्रतिदिन ३४ हजार ५० रुपयाचा चारा लागतात़ या चारा छावणीवर आतापर्यंत देवस्थानच्या वतीने १० लाखांपर्यंत खर्च करण्यात आला आहे़ प्रशासनाच्या निर्देशानुसार सर्व यंत्रणा राबविण्यात येत आहे़ तरीही शासन व प्रशासनाकडून कसलिच मदत चारा छावणीला मिळाली नाही़ जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीला सांगूनही त्यांच्याकडून चारा उपलब्ध झाला नसल्याने सर्व खर्च मात्र देवस्थानला करावा लागत असल्याचे गोजमगुंडे यांनी सांगितले़ परिषदेस जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ़टी़व्ही़ अनंतवाड, डॉ़एस़एच़ शिंदे, डॉ़ आऱटी़ पडीले, ए़आऱ पौळे आदींची उपस्थिती होती़