राज्य नाट्य स्पर्धेच्या नमनाचे ‘नाटक’
By Admin | Updated: November 8, 2016 01:27 IST2016-11-08T01:21:36+5:302016-11-08T01:27:52+5:30
औरंगाबाद : जालन्याच्या अल्फा व ओमेगा बहुउद्देशीय संस्थांनी ऐनवेळी नकार दिल्याने राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरीच्या नमनालाच सोमवारी ग्रहण लागले.

राज्य नाट्य स्पर्धेच्या नमनाचे ‘नाटक’
औरंगाबाद : जालन्याच्या अल्फा व ओमेगा बहुउद्देशीय संस्थांनी ऐनवेळी नकार दिल्याने राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरीच्या नमनालाच सोमवारी ग्रहण लागले. स्पर्धेचे उद्घाटन आणि पहिला प्रयोग तापडिया नाट्यमंदिरात आता मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता रंगणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन तसेच पहिला प्रयोग सोमवारी होणार होता.
जालन्याची अल्फा व ओमेगा संस्था ‘लॉजिक’ हे नाटक सादर करणार होती. नाट्य स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असताना ऐनवेळी अल्फा व ओमेगा संस्थेने नाटक सादर करण्यास असमर्थता दर्शविल्याचे संयोजक अंकुश भगत, रमाकांत भालेराव यांनी सांगितले. नाट्यस्पर्धेनिमित्त शहरातील रसिकांची पावले तापडिया नाट्य मंदिरकडे वळत होती; परंतु तेथे आल्यानंतर उद्घाटनाचा प्रयोग रद्द झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यामुळे रसिकांचा हिरमोड झाला.
स्पर्धेतून ऐनवेळी माघार घेणाऱ्या अल्फा व ओमेगा बहुउद्देशीय संस्थेची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. राज्य हौशी नाट्य स्पर्धेत सहभागासाठी ही संस्था आणि कलावंतांवर तीन वर्षांची बंदी घातली जाणार आहे.
हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील नाटके ऐनवेळी रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नाही; परंतु उद्घाटनाचा प्रयोग रद्द होण्याची स्पर्धेच्या ५६ वर्षांतील हा पहिलाच प्रसंग आहे.
४स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. दिलीप घारे, प्रा. दिलीप महालिंगे, अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे प्रतिनिधी पद्मनाभ पाठक, दिग्दर्शक अमेय उज्ज्वल यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता तापडिया नाट्य मंदिर येथे होणार आहे.