कसबे तडवळ्यात साकारणार अत्याधुनिक वाचनालय...
By Admin | Updated: April 14, 2017 01:06 IST2017-04-14T01:03:00+5:302017-04-14T01:06:38+5:30
कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिली महार-मांग वतनदार परिषद झाली होती़

कसबे तडवळ्यात साकारणार अत्याधुनिक वाचनालय...
कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिली महार-मांग वतनदार परिषद झाली होती़ परिषदेनिमित्त आलेले डॉ़ बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत वास्तव्याला होते, त्या शाळेची व परिसरातील विकास कामे करण्यासाठी शासनाकडून जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ या निधीतून सुसज्ज सार्वजनिक वाचनालयासह या परिसरातील विकास कामे होणार आहेत़
कसबे तडवळे येथील या ऐतिहासिक परिषदेसाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर हे २२ फेब्रुवारी १०४१ रोजी सकाळी रेल्वेने कळंब रोड रेल्वे स्टेशनवर आले होते़ त्या रेल्वे स्टेशनवरून सजविलेल्या एका बैलगाडीतून त्यांचे गावात वाजत-गाजत मिरवणुकीने स्वागत करण्यात आले़ या मिरवणुकीत ५१ सजविलेल्या बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या़ दुसऱ्या दिवशी सकाळी आयोजित परिषदेला परिसरातील जवळपास ६३ गावातील नागरिक सहभागी झाले होते़ विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय होती़ या परिषदेत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका-संघटित व्हा आणि संघर्ष करा’़ वतनदारीचा लोभ सोडा, असा मूलमंत्र दिला होता़ यातूनच प्रेरणा घेवून परिवर्तनाचे नवे युग सुरु झाले. या परिषदेसाठी ज्या शाळेत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी थांबले त्या शाळेचा व परिसराचा ऐतिहासिक ठेवा म्हणून विकास करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून होत होती़ त्यामुळेच शासनाकडून या ऐतिहासिक वास्तूच्या विकास कामासाठी एक कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून वाचनालय व इतर विकास कामे करण्यात येणार आहेत़