टंचाई आराखड्याचे काम सुरू
By Admin | Updated: July 2, 2014 01:01 IST2014-07-02T01:00:11+5:302014-07-02T01:01:20+5:30
सुनील कच्छवे , औरंगाबाद पावसाअभावी पाणीटंचाईची परिस्थिती भीषण झाल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास विभागात पुन्हा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.

टंचाई आराखड्याचे काम सुरू
सुनील कच्छवे , औरंगाबाद
पावसाअभावी पाणीटंचाईची परिस्थिती भीषण झाल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास विभागात पुन्हा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दुष्काळ आणि टंचाईचा सामना करण्यासाठी विभागीय प्रशासन कामाला लागले आहे.
विभागातील सर्व जिल्ह्यांकडून तीन महिन्यांचा कृती आराखडा मागविण्यात आला आहे. टँकर आणि विहीर अधिग्रहणाचा वेगही वाढला आहे. सद्य:स्थितीत विभागात ५७२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जुलै महिना लागला तरी पाऊस पडलेला नाही. त्यामुळे विभागात पेरण्या होऊ शकलेल्या
नाहीत.
सद्य:स्थितीत मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये जेमतेम १८ टक्के तर मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये अनुक्रमे १४ आणि ९ टक्केपाणीसाठा उरला आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या असलेला पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावा, त्यावर असलेले कृषिपंप बंद करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
आदेशांची वाट बघत बसू नका
राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठवाड्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. टंचाई निवारणाच्या दृष्टीने विविध कामे करण्यासाठी गतवर्षी मुख्यमंत्री सहायता निधीतून जिल्ह्यांना काही निधी दिला होता. त्यातील काही निधी अखर्चिक राहिला आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून हा निधी खर्च करण्यास मुदतवाढ दिल्याचे त्यांनी सांगितले.
टंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी शासकीय आदेशांची वाट बघत बसू नका, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. हवामान खात्याने ५ आणि ६ जुलै रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केला. त्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांनी खते आणि बियाणांची टंचाई भासणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचनाही याप्रसंगी दिल्या.
५७२ टँकरने पाणीपुरवठा
विभागात ७२० गावांना ५७२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २५६ टँकर सुरू आहेत. जालना जिल्ह्यात ३२, हिंगोली जिल्ह्यात १, नांदेड जिल्ह्यात २२, बीड जिल्ह्यात १८४, लातूर जिल्ह्यात ८ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ६९ टँकर सुरू आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत टँकरची संख्या ३७ ने वाढली आहे.