लसीकरणासाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST2020-12-17T04:32:13+5:302020-12-17T04:32:13+5:30
औरंगाबाद : कोरोना लस जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेला प्राप्त होण्याची शक्यता आहे. लसीकरणासाठी शासनाने ऑनलाईन प्रशिक्षण सुरु केले ...

लसीकरणासाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरु
औरंगाबाद : कोरोना लस जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेला प्राप्त होण्याची शक्यता आहे.
लसीकरणासाठी शासनाने ऑनलाईन प्रशिक्षण सुरु केले असून, या प्रशिक्षणात सध्या महापालिकेचे ४ नोडल ऑफिसर्स सहभागी झाले आहेत. आणखीन १० नोडल ऑफिसर्सची नेमणूक या कामासाठी केली जाणार आहे.
केंद्र शासनाने कोरोना लस देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. लस ठेवण्यासाठी शितगृह तयार केले आहेत. जानेवारी महिन्यात सुरु होऊ शकणाऱ्या लसीकरणाच्या मोहीमेसाठी शासनाने स्थानिक प्रशासन, स्वराज्य संस्था यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लसीकरणासाठीची केंद्र ठरविणे, प्रत्येक केंद्रात लसीकरणाची व्यवस्था करणे, त्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आदी कामे करावी लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात शासनाने ज्या नागरिकांना लस देण्यासंदर्भात सूचना केली आहे त्यांना लस दिली जाईल. लस देण्यासंदर्भात आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणाची माहिती देताना महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी नमूद केले की, शासनाने नोडल ऑफिसर्सचे प्रशिक्षण सुरु केले आहे. झुम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. पालिकेत लसीकरण अधिकारी आहेत, त्यांना देखील या कामात घेतले जाणार आहे.
लसीकरणासाठी शहरात किती केंद्र असावेत याचा अंदाज घेणे सुरु आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. लसीकरणाच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी कमी केंद्र लागतील, पण तिसऱ्या टप्प्यापासून किमान १०० केंद्र लागण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने येत्या काळात नियोजन केले जाणार आहे.