पैठण येथे नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:22 AM2019-03-23T00:22:08+5:302019-03-23T00:22:45+5:30

शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांच्या वाड्यातील (गावातील नाथ मंदिर) ज्या रांजणात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरले होते, अशा पवित्र रांजणाची शुक्रवारी तुकाराम बीजच्या दिवशी विधिवत पूजा करून नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिक प्रारंभ करण्यात आला.

 Start of Natha Shushthi at Paithan | पैठण येथे नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ

पैठण येथे नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांच्या वाड्यातील (गावातील नाथ मंदिर) ज्या रांजणात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरले होते, अशा पवित्र रांजणाची शुक्रवारी तुकाराम बीजच्या दिवशी विधिवत पूजा करून नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिक प्रारंभ करण्यात आला.
रांजण ज्या दिवशी भरेल त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात, अशी शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांची श्रद्धा आहे. यंदा किती दिवसांनी रांजण भरेल, याकडे वारकरी भाविकांचे लक्ष लागले आहे.
शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या गावातील मंदिरात असणाऱ्या पवित्र रांजणात शुक्रवारी गोदावरीतून जल आणून भरण्यास सुरुवात करण्यात आली. तुकाराम बीजच्या मुहूर्तावर नाथ वंशजांनी या पवित्र रांजणाची विधिवत पूजा केल्यानंतर भाविकांनी रांजण भरण्यास प्रारंभ केला. भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्यांच्या रूपात पैठणनगरीत वास्तव्य करून सलग १२ वर्षे नाथ महाराजांच्या वाड्यातील या पवित्र रांजणात गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरल्याचा इतिहास आहे. रांजण भरण्यास प्रारंभ झाला म्हणजे नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिकपणे प्रारंभ झाला, असे मानले जाते.
जगाच्या पाठीवर श्री संत एकनाथ महाराज असे संत होते की, भगवान श्रीकृष्णांना देखील नाथ महाराजांच्या घरी राहून सेवा करण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली. भगवंत ‘श्रीखंड्या’ हे रूप धारण करून नाथांच्या घरी प्रकट झाले. नाथ महाराजांची भेट घेऊन सेवा करण्याचा मनोदय व्यक्त करीत सांगाल ते, पडेल ते काम करीन, मला सेवा करू द्या, अशी विनंती करून नाथ महाराजांची परवानगी मिळविली.
नाथ महाराजांच्या घरी राहून भगवंत सर्व कामे करू लागले. सडा, भांडी, स्वयंपाक, उष्टावळी, गंध उगळणे, स्नानाचे पाणी काढून देणे, गिरिजा आईस स्वयंपाकास मदत करणे, नाथ महाराज कीर्तन करीत असताना धृपद म्हणणे, कीर्तनात नाचणे, अशी नानाविध कामे करीत साक्षात भगवंत नाथ महाराजांसोबत सावलीसारखे वावरत होते.
आवडीने कावडीने वाहिले पाणी।
एकचि काय वदावे पडिल्या
कार्यात वाहिले पाणी।।
रांजणात भरले पाणी
गावातील नाथ मंदिरात पवित्र रांजण आहे. पूर्वी नाथ महाराज या मंदिरात राहत होते. नाथ महाराजांच्या या वाड्याचे रूपांतर आज मंदिरात करण्यात आले आहे. याच मंदिरात असलेल्या रांजणात भगवान श्रीकृष्णाने सलग १२ वर्षे गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरले.

Web Title:  Start of Natha Shushthi at Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.