मोटारीच्या पाण्यावर चक्की सुरू

By Admin | Updated: March 3, 2015 00:29 IST2015-03-03T00:26:05+5:302015-03-03T00:29:44+5:30

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्या पाहण्यासाठी आलेले बहुतांश पर्यटक ऐतिहासिक पाणचक्कीही पाहण्यासाठी हमखास येतात.

Start the mill on the car's water | मोटारीच्या पाण्यावर चक्की सुरू

मोटारीच्या पाण्यावर चक्की सुरू


औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्या पाहण्यासाठी आलेले बहुतांश पर्यटक ऐतिहासिक पाणचक्कीही पाहण्यासाठी हमखास येतात. मात्र, १ फेब्रुवारीपासून पाणचक्कीत नहरचे पाणीच येणे बंद झाले आहे. त्यामुळे वक्फ बोर्ड प्रशासनाकडून पर्यटकांना मूर्ख बनविण्यासाठी हौदातील पाणी पाणचक्कीच्या भिंतीवर मोटारीने सोडण्यात येत आहे. ही शुद्ध फसवणूक पाहून पर्यटकांचा भ्रमनिरास होत आहे.
पूर्वी ऐन उन्हाळ्यातही पाणचक्कीत पाणी येत असायचे. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीच येणे बंद झाले आहे. कारण नहर-ए-पाणचक्कीच्या पाण्यावर काही समाजकंटकांनी अक्षरश: दरोडा टाकण्याचे काम सुरू केले आहे. पाण्याची ही गंभीर चोरी थांबविण्यासाठी आजपर्यंत प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही, हे विशेष. दरवर्षी उन्हाळा येतो आणि जातो. पाणचक्कीच्या पाण्याची चार दिवस बोंबाबोंब होते, नंतर सर्व काही अलबेल होते. पाण्याची ही चोरी आणखी काही वर्षे अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास ऐतिहासिक ठेवा असलेल्या नहरी काही दिवसांतच इतिहासजमा होतील.
पाण्यावर पिठाची गिरणी
१७१४ साली पाणचक्कीची उभारणी करण्यात आली. रशियातून आलेले संत बाबा शाह मुसाफिर यांनी पाणचक्कीमध्ये धार्मिक शिक्षण देण्यासाठी निवासी आश्रमशाळा सुरू केली. त्यावेळी त्यांचे परमशिष्य व स्थापत्य अभियंता बाबा शाह महेमूद यांनी मलिक अंबरच्या ‘नहर-ए-अंबरी’तत्त्वानुसार औरंगाबादच्या उत्तरेला ८ मैलावरून नहर खोदून पाणचक्कीला पाण्याची व्यवस्था करून दिली. जटवाड्याच्या बाजूला असलेल्या ‘ओव्हर’ नदीतून या नहरचा उगम झाला आहे. या नहरीद्वारे आणलेल्या पाण्यावर पिठाची गिरणी चालवून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भोजन दिले जायचे, अशी या नहरची आख्यायिका आहे.
जागोजागी नहर फोडून होत असलेल्या पाण्याच्या चोरीमुळे पाणचक्कीपर्यंत पाणी पोहोचणे दुरापास्त झाले आहे. सदासर्वदा पाण्याचा धबधबा ओकणारी पाणचक्की आज कोरडी पडली आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये टँकरच्या पाण्यावर पाणचक्कीचा खोटा इतिहास पर्यटकांसमोर ठेवण्याची वेळ आली आहे.

Web Title: Start the mill on the car's water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.