राजकीय पक्ष काढण्यापेक्षा एखादा उद्योग सुरू करा : राजरत्न आंबेडकर
By | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:04+5:302020-11-28T04:06:04+5:30
औरंगाबाद : राजकीय पक्ष काढण्यापेक्षा एखादा उद्योग सुरू करा. शिक्षण संस्था काढा. आता आम्हाला राजकीय आरक्षणही नको. कारण ते ...

राजकीय पक्ष काढण्यापेक्षा एखादा उद्योग सुरू करा : राजरत्न आंबेडकर
औरंगाबाद : राजकीय पक्ष काढण्यापेक्षा एखादा उद्योग सुरू करा. शिक्षण संस्था काढा. आता आम्हाला राजकीय आरक्षणही नको. कारण ते देण्यामागचा हेतूच साध्य होताना दिसत नाही. आज आंबेडकरी समूहाला सामाजिक व आर्थिक प्रगतीच्या लढाईची गरज आहे. यापुढे त्यावरच लक्ष केंद्रित करा, असा हितोपदेश गुरुवारी येथे राजरत्न आंबेडकर यांनी केला.
ते समता सैनिक दलाच्या, औरंगाबाद विभागाच्या वतीने मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, मजनू हिल येथे आयोजित संविधान गौरव दिन सोहळ्यात बोलत होते. सुभेदार मेजर बाजीराव सोनुने अध्यक्षस्थानी होते.
त्यांनी सांगितले, आता घरातल्या घरात पाहणे खूप झाले. मी कधीही पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडे मागण्यांचे निवेदन घेऊन जात नाही. ११ राज्यांमध्ये माझे नेटवर्किंग आहे. अलीकडेच मी माझे गाऱ्हाणे यूएनकडे मांडून आलो. तिकडून नाक दाबले की, इकडे आपोआपच तोंड उघडले जाते.
संविधानाचे प्रत्येक पान रोज पाडलं जातंय. संविधानाच्या पहिल्या कलमापासून ते ३९५ व्या कलमापर्यंत रोज पायमल्ली होत आहे. संविधानाची ५० टक्के अंमलबजावणी केली गेली असती, तर हा देश समृद्ध आणि संपन्न झाला असता.
आज जगात अनेक देशांमध्ये संविधान दिन साजरा केला जातो; परंतु भारतात मात्र एकच समूह संविधान दिन साजरा करतो. एससीमधील बौद्ध समाजच हा दिन साजरा करतो. असे का व्हावे याबद्दल राजरत्न आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केली.
प्राचार्य नामदेव सोनवणे, डॉ. सुधीर चक्रे, गणपती पाखरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विलास शिरसाट, कारभारी त्रिभुवन, मंगल पगारे, रेखा राऊत, प्रवीण साळवे, भीमराव घोरपडे, शंकर म्हस्के आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.