दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ
By Admin | Updated: October 23, 2014 00:16 IST2014-10-23T00:13:03+5:302014-10-23T00:16:09+5:30
लातूर : दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला असून, आकाशदिवे आणि पणत्यांनी लातूर शहर सजले आहे.

दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ
लातूर : दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला असून, आकाशदिवे आणि पणत्यांनी लातूर शहर सजले आहे. रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी होत असून, बुधवारी अभ्यंग स्नानाने दिवाळीला प्रारंभ झाला आहे. बुधवारी
दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच फटाक्यांचा आवाज आणि सायंकाळच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाईने घरे उजळून निघाली आहेत. अंगणात काढलेली रांगोळी आणि दरवाजांवर लावलेल्या आकाशदिव्यांनी शहर उजळून निघाले आहे. शहर व जिल्हाभरात हा उत्साह असून, बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध वस्तू खरेदीसाठी बुधवारीही गर्दी दिसून आली. या सणानिमित्त लातूर शहरातील राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात फटाके बाजार सजला असून, या बाजारातही बुधवारी बच्चे कंपनीसह पालकांची मोठी गर्दी होती. कपडे, सोने-चांदी, जनरल स्टोअर्स, रांगोळी, किराणा आदी दुकानांत खरेदीसाठी बुधवारीही झुंबड होती. यामुळे शहरातील वातावरण प्रफुल्लित झाले असून, कपडे खरेदीसाठी तर तरुणाईचा मोठा उत्साह दिसत आहे. मोठ्या दुकानांत गर्दी आहेच. शिवाय, छोटी दुकानेही ग्राहकांनी फुलली आहेत. एकंदर, दिवाळीचा माहोल लातूर शहरात सध्या जोररात सुरू आहे. (प्रतिनिधी)४
दिवाळी सणानिमित्त लक्ष्मीपूजन गुरुवारी घरोघरी होणार आहे. गुरुवारी सकाळी ६.०९ ते रात्री ८.३९ या वेळेत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. दिवाळी वही पूजनासाठी सायंकाळी ६ ते ७.४२ हा अमृत मुहूर्त असून, ७.४३ ते ९.१५ ला चल, रात्री १२.२१ ते उत्तररात्री १.५४ पर्यंत लाभ, उत्तररात्री ३.२७ ते ५ लाभ, ५.०१ ते ६.३७ अमृत या शुभचौघडीत वहीपूजनाचा मुहूर्त आहे. त्यादृष्टीने लातूर शहरात दुकानदार तसेच घरोघरी लक्ष्मीपूजन व वही पूजनासाठी तयारी केली जात आहे. पुजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यात आली असून, बुधवारी दिवसभर बाजारात ग्राहकांची गर्दी होती.