सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाला उत्साहात प्रारंभ
By Admin | Updated: February 18, 2015 00:42 IST2015-02-18T00:35:32+5:302015-02-18T00:42:37+5:30
लातूर : लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास मंगळवारी सायंकाळी मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला़

सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाला उत्साहात प्रारंभ
लातूर : लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास मंगळवारी सायंकाळी मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला़ मध्यरात्री गवळी समाजाच्या वतीने परंपरेनुसार श्री सिद्धेश्वरास दुधाचा महाअभिषेक करण्यात आला़ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते सकाळी महाअभिषेक झाला़ त्यानंतर ध्वजारोहन करुन महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला़
यावेळी सावता माळी मंदिराच्या वतीने सिद्धेश्वर प्रांगणात पुष्पवृष्टी करण्यात आली़ मोठ्या उत्साही वातावरणात या यात्रेला प्रारंभ झाला़ देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ गवळी समाजबांधवांच्या वतीने सिद्धेश्वरास अभिषेक करण्यात आल्यानंतर दर्शनाला प्रारंभ झाला़ मध्यरात्री ते सकाळपर्यंत हजारो भाविकांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले़ ध्वजारोहनानंतर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, तहसीलदार राहूल खांडेभराड यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला़ देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष बाळकृष्ण पतंगे, यात्रा संयोजक अशोक भोसले, देवस्थानचे सचिव ज्ञानोबा गोपे, रमेश बिसेन, सुरेश गोजमगुंडे, सुरेंद्र पाठक, ज्ञानोबा कलमे आदींची उपस्थिती होती़
यात्रा महोत्सवात विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत़ महिला मेळावा, कृषि प्रदर्शन होणार आहे़ सांस्कृतिक कार्यक्रमाचीही रेलचेल राहणार आहे़ रहाट पाळणे, ब्रेक डान्स, इलेक्ट्रॉनिक ट्रेन, ड्रायगॉन, मौत का कुंआ असे अनेक व्यवसायीक यात्रेत आले आहेत़
दरम्यान, मंगळवारी दुपारी काढण्यात आलेल्या या शाही मिरवणुकीत अश्व, उंट सहभागी करण्यात आले होते़
या मिरवणुकीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला़ मिरवणुकीत भाविक भक्त व कार्यकर्ते देवस्थानचे पदाधिकारी सहभागी झाले होते़ ही मिरवणूक गुळमार्केट, हनुमान चौक, गंजगोलाई, सुभाष चौक, खडक हनुमान, पटेल चौक, सुरत शाहवली दर्गा रोड मार्गे सिद्धेश्वर वेस येथून रात्री सिद्धेश्वर मंदिरात पोहोचली़ या ठिकाणी ध्वजाची पूजा करुन झेंडा मिरवणूकीचा समारोप करण्यात आला़ (प्रतिनिधी)
मंगळवारी मंगलमय वातावरणात प्रारंभ झालेला यात्रा महोत्सव २ मार्चपर्यंत राहणार आहे़ बचत गटांच्या वस्तुंचे प्रदर्शन व महिलांच्या हस्ते रुद्राभिषेकही होणार आहे़ मंगळवारी दुपारी यात्रेनिमित्त भव्य झेंडा मिरवणूक शहरातून काढण्यात आली़ यंदाच्या झेंडा मिरवणुकीत सिद्धेश्वर यात्रेच्या धर्तीवर नंदीध्वज सामिल करण्यात आला होता़ देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे व स्मिता गोजमगुंडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली़ नंदीध्वजाची पूजा झाल्यानंतर मार्केट यार्डातील गौरीशंकर मंदिरापासून या भव्यदिव्य शाही झेंडा मिरवणुकीस प्रारंभ झाला़ या मिरवणुकीत विविध वाहने सजविण्यात आले होते़ रथावर पौराणिक आणि ऐतिहासिक सजीव देखावे आकर्षण ठरले़ झांज पथक, शिवराज्याभिषेक, सजीव पथक, दिंडी, नृत्य पथक, महिला-पुरुष, बाल भजनी मंडळे, ढोल ताशा, धनगरी ढोल, आराधी पथक, लाठी-काठी, प्राचिन युद्ध कला पथक अशा थाटात वाजत-गाजत ही मिरवणूक काढण्यात आली़ सिद्धेश्वर मंदिरात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.